पुणे जिल्हा : गांजाळे यांचे पाचव्या दिवशी उपोषण सुरूच

मंचर – मराठा आरक्षणासंदर्भात सरकार करत असलेल्या चालढकलीबाबत मंचर येथे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचे पाचव्या दिवशी उपोषण सुरू आहे. त्यांची मंचरचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी गुरुवारी (दि. 2) दुपारी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली; परंतु गांजाळे यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला.
गांजाळे यांनी मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. याची दखल घेत मंचर विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन मुंडे, अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन माजी सरपंच दत्ता गांजाळे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.
यावेळी गांजाळे म्हणाले जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार निर्णय घेत नाही. तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. यावेळी शरद बॅंकेचे संचालक अजय घुले, मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, मंचर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत बागल, संतोष गावडे, सुरेश निघोट, रंगनाथ बाणखेले उपस्थित होते.
सरकारच्या पातळीवर मराठा आरक्षणासंदर्भात सातत्याने बैठका सुरू असून त्याबाबतच लवकर निर्णय जाहीर केला जाईल. त्यामुळे आंदोलकांनी किंवा उपोषणकर्त्यांनी संयमाची भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य करावे.
– गोविंद शिंदे, प्रांताधिकारी





