Pune District : विज्ञान प्रदर्शनातून भविष्यातील शास्त्रज्ञ उदयास येतील -काळे

पळसदेव : सध्या स्पर्धेचे युग आहे. विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्वच क्षेत्रात क्रांती झाली आहे. या क्रांतीचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत मागे राहून चालणार नाही. त्याकरिता अशा विविध उपक्रमांची आवश्यकता असून त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासूवृत्ती निर्माण होईल व यातूनच भविष्यातील शास्त्रज्ञ उदयास येतील, असे आशावाद पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांनी व्यक्त केला.
येथील श्री पळसनाथ पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन व कला साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी येथील बालवैज्ञानिकांनी पाणी बचत, सौर उर्जा, मृदा संधारण, वृक्षसंवर्धन, चांद्रयान, रोबोट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरण आदि विषयक प्रकल्प सादर केले. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य स्वतः तयार करून विज्ञान क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, पोलीस पाटील आप्पा बांडे, अमोल जाधव यांसह पालक ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेत्तर उपस्थित होते. प्राचार्या सिद्धमा पाटील, रूपाली हिंगमिरे, अरुणा काळे, राधिका जाधव, ललिता काळे, दीपाली रणसिंग, पूजा सूर्यवंशी आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले.





