Pune District : सतारकावस्ती शाळा इमारतीला निधी मिळावा

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याकडे मागणी
राजगुरुनगर –खेड तालुक्यातील सतारकावस्ती (रेटवडी) येथील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन सुसज्ज इमारतीचा निधी मंजूर करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल (बाबा) राक्षे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सतारकावस्तीतील जिल्हा परिषद शाळा शैक्षणिक गुणवत्तेमुळे नेहमीच अग्रभागी आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असूनसुद्धा शाळेकडे आधुनिक व सुसज्ज इमारत नाही. सुरुवातीला जागेच्या अभावामुळे ही समस्या होती; मात्र ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे तीन एकर गायरान जमीन उपलब्ध झाली असून, बांधकामाचा अडथळा दूर झाला आहे. या शाळेच्या नवीन इमारतीसाठी अंदाजे 8 ते 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा परिषद, तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. रेटवडी गटातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना देण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य किरण पवार, मुख्याध्यापक सोपानराव मांजरे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुनील वाबळे, विलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. रेटवडी गावातील विकासकामांसाठी साडेचार कोटी, तर शाळेच्या नवीन इमारतीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर व्हावा अशी मागणी अनिल (बाबा) राक्षे यांनी केली.
रेटवडी शाळा हे आदर्श जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण आहे. या शाळेच्या नवीन इमारतीसाठी तसेच गावातील विकासकामांसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
-गजानन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी





