पुणे जिल्हा : जुन्नरला पाडळी रस्त्यासाठी 1 कोटींचा निधी मंजूर

सहा महिन्यांत काम पूर्ण होणार – शरद सोनवणे
जुन्नर – जुन्नर-मुंबई मार्गाला जोडल्या जाणाऱ्या शहरातील पाडळी परिसरातील मार्गासाठी नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून येत्या सहा महिन्यांत हा 0.7 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण होणार असल्याची माहिती माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
जुन्नर येथे या मार्गाच्या भूमिपूजनप्रसंगी माजी आमदार सोनवणे बोलत होते. जुन्नर येथील नाका क्र. 4 ते कृष्णराव मुंढे विद्यालय या मार्गाचे डांबरीकरण व रुंदीकरण होणार आहे तसेच परिसरात होणाऱ्या विकासकामांमुळे शहराच्या उत्तर भागाचा विकास वेगाने होणार आहे, तसेच व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे माजी नगराध्यक्षा अलका फुलपगार यांनी सांगितले.
दरम्यान या मार्गाचे दोन्ही बाजूला 1.5 मीटरचे रुंदीकरण होणार असून हा मार्ग 8 मीटरचा होणार आहे. भुयारी गटर, पाथवे आदी विकासकामे या निधीतून होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे हरी गायकवाड यांनी दिली. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, शहरप्रमुख अविनाश करडीले, दर्शन फुलपगार,
बाळासाहेब सोनवणे, श्याम खोत, अकील शेख, अरुण मेहेर, सुजाता लुंकड, पुष्कराज जंगम, गणेश पातुरकर, मनोज शिंदे, सोनू पूरानीक, सुभाष पांडे, सिद्धार्थ लोणकर, राजेश कारभळ, विविध शाखाप्रमुख व परिसरातील नागरिक उपस्थित होते.





