पुणे जिल्हा: कारेगावात चार बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट आधार कार्डासह अवैध वास्तव्याचा पर्दाफाश

रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना रांजणगाव एमआयडीसी पोलिस आणि पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईद्वारे ताब्यात घेतले आहे. बनावट आधार कार्ड वापरून गेल्या दोन वर्षांपासून हे नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचा खुलासा या कारवाईत झाला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये १) कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. दामोदर, ठाणे फुलताला, जिल्हा खोलना, बांगलादेश), २) अकलस मजेद शेख (वय ३९, रा. उसला, ठाणे पोटालीपाडा, जिल्हा गोपालगंज, बांगलादेश), ३) मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय ३५, रा. मादपपाशा, तालुका कालिया, जिल्हा नोडाइल, बांगलादेश) आणि ४) जाहिद अबूबकर शेख (वय ३०, रा. पिडोली, तालुका कालिया, जिल्हा नोडाइल, बांगलादेश) यांचा समावेश आहे. हे सर्व सध्या कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे राहत होते. त्यांना आज पहाटे ५ वाजता अटक करण्यात आली.
पोलिस तपासात असे आढळून आले की, हे चारही बांगलादेशी नागरिक कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारत सरकारने नेमून दिलेल्या मार्गाशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतीय हद्दीत प्रवेश करून गेल्या दोन वर्षांपासून कारेगावात बनावट आधार कार्ड वापरून अनधिकृतपणे वास्तव्य करत होते. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस कर्मचारी मोसिन बशीर शेख यांना गोपनीय माहितीच्या आधारे कारेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची खबर मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने रांजणगाव एमआयडीसी पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे छापा टाकून सदर चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना १५ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या नेतृत्वात पार पाडली गेली.
या कारवाईत पोलीस अधिकारी अविनाश थोरात, विशाल गव्हाणे, दत्तात्रय शिंदे, विशाल भोरडे, रवींद्र जाधव, मोसिन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे आणि आकाश सवाने यांच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस अधिकारी नीलकंठ तिडके करत आहेत. ही कारवाई परिसरात अवैध वास्तव्यास आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.





