Pune District : अभय योजनेतून साडेचार हजार अर्ज

सुरेंद्र जेवरे यांच्यासह सहकाऱ्यांचा पुढाकार
बारामती – शास्तीकर अभय योजनेच्या माध्यमातून बारामती शहरातील साडेचार हजार अर्ज संकलित करण्याचे काम शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख व डॉ रंगनाथ जेवरे, समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र जेवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. सुविधा कक्षाच्या माध्यमातून शास्ती व दंडाच्या रकमेतून सुटका व्हावी, यासाठी साडेचार हजार मिळकत धारकांनी अर्ज दाखल केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या सुविधा कक्षास भेट दिली. शास्ती कर अभय योजनेचे कार्य जाणून घेतले.
शास्तीच्या रूपात मिळकत धारकांना मोठ्या प्रमाणात रक्कम भरावी लागणार होती. मात्र, शासन निर्णयानुसार शास्तीची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम मिळकत धारकांनी भरण्याचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने सुरेंद्र जेवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ कक्ष उभारून शास्तीकर अभय योजनेच्या माध्यमातून मिळकत धारकांचे अर्ज संकलित केले. २१ दिवसांत साडेचार हजार अर्ज त्यांनी भरून घेतले. ६ ते ३० जूनपर्यंत नागरिकांनी सुविधा कक्षात अर्ज दाखल केले.
गेल्या अनेक वर्षांपासून मिळकतधारकांना मोठ्या प्रमाणावर शास्तीची रक्कम लावण्यात आली आहे. मिळकत धारकांना यापासून दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने मिळकतधारकांना शास्ती करामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बारामतीमध्ये सुरू केलेल्या शास्तीकर अभय योजनेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. साडेचार हजार अर्ज दाखल झाले. सुविधा कक्षामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
– सुरेंद्र जेवरे, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख.





