Pune District: अवैध वृक्षतोडीला वन विभागाकडून चाप

मंचर : जळाऊ लाकूड अवैध वाहतूकप्रकरणी घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील वन विभागाने कारवाई केली आहे. नितीन लक्ष्मण गव्हाणे (रा.साल, बाभूळवाडी,ता.आंबेगाव) यांचा टेम्पो मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी सांगितले.
घोडेगाव वनपरिक्षेत्रातील साल येथील गवारवाडी-साल रस्त्यालगत वनोपज जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक रविवार, दि.१८ रोजी रात्री होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वनपरिमंडळ अधिकारी जी. आर. झांजरे, वनरक्षक एस. यू. गायकवाड, ए. जे. कंधारकर यांचे एक पथक तयार करून त्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.
त्यावेळी नितीन लक्ष्मण गव्हाणे यांच्या टेम्पोत (एमएच-१४, एएस-८७५९) जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळल्याने वाहन व त्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
अशा अवैध कृत्याकरिता एक वर्षापर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीची तरतूद करण्यात आली असल्याने लाकडांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वन विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी दिला आहे.





