पुणे जिल्हा : सेंट्रल किचनद्वारे येणारे जेवण अवेळी ;निकृष्ट पुरवठ्यामुळे आदिवासी वसतिगृहात सुविधा बंद

मंचर – पुणे जिल्ह्यातील आदिवासी मुले व मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी कोटमदरा (ता.आंबेगाव) येथून सेंट्रल किचनच्या माध्यमातून देण्यात येणारे जेवण वेळेत पोहचत नसल्याने बंद करण्यात आले आहे; परंतु आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेन्ट्रल किचनद्वारे जेवण पुरवठा केला जात असल्याचे घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सेंट्रल किचनचे जेवण चांगल्या पद्धतीचे नसते, तसेच वेळेत पोहचत नसल्याने बंद करण्यासंदर्भात आंदोलन, निवेदन देत मागणी करण्यात येत होती. एसएफआयच्या मागणीला यश येऊन त्याजागी पूर्वीची मेस पद्धत सुरू झाल्याचे एसएफआयचे जिल्हा सचिव नवनाथ मोरे यांनी सांगितले.
कोटमदरा येथे प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या आंबेगाव, खेड व जुन्नर येथील 14 आश्रमशाळा, 14 वसतिगृह यांतील निवासी विद्यार्थ्यांना भोजन पुरविणे 15 जून 2023 पासून सुरू झाले आहे. मात्र, या योजनेच्या पहिल्याच दिवसापासूनच जेवणाचा निकृष्ट दर्जा व इतर समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि एसएफआय संघटनेने गृहपाल, प्रकल्प अधिकारी यांनी या समस्या दर्शनास आणून दिल्या. त्यानंतर मुले आणि मुलींच्या वसतिगृहांतील देण्यात येणारे जेवण बंद करण्यात आले.
सेंट्रल किचनच्या जेवणाचा निकृष्ट दर्जा व इतर समस्यांना विद्यार्थ्यांना सातत्याने सामोरे जावे लागत होते; परंतु विद्यार्थ्यांच्या एकजुटीला आणि संघटनेच्या लढ्याला यश आले आहे. मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेन्ट्रल किचनद्वारे देत असलेल्या जेवणाविषयी विद्यार्थी कोणाकडे समस्या मांडणार, ते आंदोलन करू शकत नाहीत. आश्रमशाळेत कोटमदरा येथून सेन्ट्रल किचनमधून देण्यात येणारे जेवण बंद करण्यासंदर्भात आंदोलन केले जाईल. असे एसएफआयचे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी यांनी सांगितले.
14 आश्रमशाळेतील सुमारे 4500 ते 5000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना कोटमदरा येथून सेन्ट्रल किचनमधून भोजन पुरविले जात आहे .परंतु वसतिगृहातील 450 ते 500 विद्यार्थ्यांना वेळेत भोजन जात नसल्याने ते सध्या बंद करण्यात आले आहे.
– बळवंत गायकवाड, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव





