Pune District : अन्न औषध प्रशासन विभागाला पुरंदरचा विसर?

दिवे : पुरंदर तालुक्याला धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि साधू संतांचा वारसा लाभलेला आहे. मात्र अलीकडच्या काळात सर्वत्र बकालीकरण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बेकायदा व्यवसायांची चांगलीच चलती सुरू आहे. गावठी हातभट्टीची दारू गावोगावी आणि गल्लीबोळात मिळत असून तंबाखू, सुपारी पासून बनविलेला मावा आता मुंबईपर्यंत विकला जात आहे.
पुरंदर तालुक्याच्या बाहेरील व्यावसायिकांनी हातगाड्या थाटून खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावले आहेत. आरोग्यास हानिकारक पदार्थ विकले जात असल्याने दवाखाने फुल्ल होत आहेत. कोणत्याही परवानगी शिवाय सासवड शहरा सह संपूर्ण तालुक्याच्या ग्रामीण भागात खुलेआम व्यवसाय सुरू असून अन्न औषध प्रशासन विभागाला पुरंदर तालुक्याचा विसर पडला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दारू धंद्यांना परवानगी देणे अथवा नाकारणे उत्पादनशुल्क विभागाचे काम आहे. मात्र या विभागातील अधिकार्यांसोबत व्यावसायिकांचे लागेबांधे आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कारण उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कधीही रस्त्यावर उतरलेले दिसून येत नाहीत. सर्व व्यवहार काचेच्या आडून चालतो. त्यांच्यामुळेच तालुक्यात ठिकठिकाणी दररोज हजारो लिटर गावठी दारू तयार करून सर्वत्र बिनबोभाट वितरीत केली जात आहे का, असा सवाल ही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
करोनाच्या काळात पोलिसांनी कित्येक मावा विक्री सेंटर आणि मावा तयार कारखान्यांवर छापे घालून संपूर्ण यंत्रणा जप्त केली होती. मात्र सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु झाल्यानंतर मावा पुन्हा मोठ्या जोमाने सुरु झाला आहे. पान सेंटर केवळ नावालाच असून सर्व पान सेंटरमधून पान ऐवजी माव्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे याचा अन्न औषध प्रशासन विभागाला अद्यापही सुगावा लागलेला नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावरील हातगाड्यांना कोणाचे अभय ?
सासवड शहरामध्ये अनेक रस्त्यांवर व्यावसायिकांनी हातगाड्या थाटल्या असून यामध्ये पाणीपुरी, वडापाव आणि इतर खाण्याचे पदार्थ विकले जात असून याकडे अन्न औषध प्रशासन विभागासह सासवड नगरपरिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. एकीकडे हातगाडीवरील खाद्य पदार्थांची कोणतीही तपासणी केली जात नाही. तर ज्या हातगाड्या टाकल्या आहेत त्या रस्त्यालगत आणि पदपथावरती. त्यामुळे नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. नगरपालिका प्रशासन अधिकृत परवानगी देत नसेल, परंतु दररोज त्यांच्याकडून पावती फाडून घेत असल्याने एकप्रकारे त्यांना व्यवसायाचे परवाना दिल्यासारखे वागत असून यामध्ये तालुक्यां बाहेरील नागरिकांची संख्या मोठी असल्याने त्यांना कोणाचे अभय आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
माझ्याकडे सहा तालुके असल्याने आठवड्यातील अनेक दिवस बाहेरच द्यावे लागतात. त्यामुळे फक्त पुरंदरला जादा वेळ देता येत नाही. आमच्या कार्यालयाकडे याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तालुक्याच्या ग्रामीण भागासह सासवड परिसरात बेकायदा दारूधंदे असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या आहेत. नियमानुसार त्यांना अटक करण्याचे अधिकार नसल्याने दंड केला आहे. तसेच नोटीस देवून सोडण्यात आले आहे. आणखी कारवाई करण्यात येईल. यापुढे मोठे गुन्हे दाखल करण्याची आमची तयारी सुरू आहे.
– संभाजी बर्गे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सासवड





