Pune District : तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर फुलांचा वर्षाव

रांगोळीच्या पायघड्या : भांडगावात न्याहारी
यवत – यवत (ता.दौंड) येथील संत तुकोबांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि.२४) भांडगावमध्ये सकाळच्या न्याहारीसाठी विसावला. गावकऱ्यांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालत, फुलांची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दोरगे, सरपंच लक्ष्मण काटकर, उपसरपंच नंदा जाधव, मधुकर दोरगे, दत्तात्रय दोरगे, शाम कापरे, विजय दोरगे, रवींद्र जाधव, रवींद्र दोरगे, काँग्रेसचे विठ्ठल दोरगे आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालखी सोहळ्याचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी “ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष केला. यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. महिलांनी रांगोळ्यांनी पायघड्या घालून पालखी मार्ग सुशोभित केला.
पुष्पवृष्टी करीत पालखीच्या दर्शनासाठी लहानथोरांनी गर्दी केली. सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण भांडगाव ग्रामस्थ, महिला मंडळे, तरुण मंडळे आणि बालवारकरी सहभागी झाले होते.
यावेळी पालखी सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे मार्गस्थ झाला. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. दर्शनासाठी परिसरातील अनेक गावांमधून आलेले वारकरी, भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामस्थांनी विशेष नियोजन केले होते.
पिठलं, भाकरीचा आस्वाद
भांडगाव ग्रामस्थांच्या वतीने २५० किलो पिठले, २५० किलो भात आणि तब्बल २० हजार भाकरीचे जेवण तयार केले होते. गावातील दानशूर व्यक्तींनी चहा, नाश्ता, जेवणाची सोय केली होती. सकाळच्या न्याहारीनंतर पालखी सोहळ्याने पुढील वरवंडच्या मुक्कामाच्या दिशेने प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी चौफुला येथे दुपारच्या विसावासाठी पालखी सोहळ्याने विसावा घेतला.





