कापूरहोळ : कापूरहोळ (ता.भोर) ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्याकडे पाच सदस्यांनी राजीनामा दिला. तसेच सरपंच ग्रामपंचायतीत उपस्थित नसल्यामुळे ग्रामपंचायतीला पोस्टाने राजीनामे पाठविले आहेत. कापूरहोळच्या सरपंच मंगल संजय गाडे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत या सदस्यांनी राजीनामा दिला आहे. सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये विश्वासात घेतले जात नाही, आमचे म्हणणे विचारात घेतले जात नाही, ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग बुक तपासावे, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची कामाबाबत सखोल चौकशी व्हावी, असे राजीनामा अर्जात म्हटले आहे. ग्रामपंचायतीच्या नऊपैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात गुलाब बाळासाहेब गाडे, रोहित सर्जेराव जगताप, शोभा आनंदा गाडे, सविता विवेक गाडे, विनया अनिकेत सपकाळ यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीत राजीनामे देण्यासाठी गेलो असता सरपंच व ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे राजीनामे पोस्टाने पाठविले आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, असे शोभा गाडे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी धनावडे म्हणाले, सदस्यांमी राजीनामा सरपंचाकडे देणे गरजेचे आहे. संबंधितांचा राजीनामा ग्रामपंचायतीला पुढील कारवाईसाठी पाठविणार आहे. याबाबत ग्रामसेवक संजय वाकळे म्हणाले की,सदर राजीनामा पोस्टाद्वारे सरपंचांना मिळाले असून २१ एप्रिल रोजी मासिक सभेचे आयोजन केलेले आहे.सभेत पुढील निर्णय सरपंच घेतील.