पुणे जिल्हा : ‘छत्रपती’चा पहिला हप्ता 2900 रुपये

अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांची माहिती
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना 2023 -24 च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना पहिला हप्ता प्रतिटन 2900 रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.
यावर्षी श्री छत्रपती कारखान्याचा पहिला हप्ता किती? हा प्रश्न बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात विचारला गेला; मात्र यावर्षी छत्रपती कारखाना सभासदांना योग्य भाव देईल असे सूतोवाच व संकेत कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी याच कार्यक्रमात दिले होते. यावर्षीच्या हंगामात छत्रपती कारखाना अंदाजे आठ लाख टन कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करेल व कार्यक्षेत्राबाहेरील दोन ते सव्वा दोन लाख टन गाळपासाठी घेऊन एकूण हंगामात सव्वा दहा लाख टन गाळप करेल अशा स्वरूपाची नियोजन केले आहे.
कारखान्याने विस्तारवाढ, सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जातून कारखाना लवकरच बाहेर पडणार आहे, मात्र काही सभासद इतर कारखान्यांकडून जादा दर मिळेल या अपेक्षेवर बाहेर ऊस देऊ देण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. कारखान्याने सव्वा दहा लाख टन गाळप गृहीत धरून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा यांच्याशी करार केलेला आहे, तसेच कारखान्यातील मशिनरी रिपेअरिंग व ओव्हरऑईलिंग इत्यादीसाठी खर्च केलेला आहे. अशा परिस्थितीत कार्यक्षेत्राबाहेरील ऊस बाहेर गेला तर कारखान्याचे गाळप कमी होऊन मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
सभासदांच्या मालकीची ही संस्था टिकावी यासाठी सर्वच सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सभासदांनी या गाळप हंगामात ऊस इतर कारखान्यांना गळितास न देता आपल्याच कारखान्यास गाळपास द्यावा. जास्तीचे गाळप झाले तर साखर व मळीचे उत्पादन तसेच वीज निर्मितीमध्ये वाढ होणार आहे, पर्यायाने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सभासदांना आणखी ऊस दर वाढवून देणे शक्य होणार आहे.
आपला ऊस आपला कारखाना
दुसरीकडे ज्यावेळी सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस होईल, त्यावेळी इतर कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपास नेणार नाहीत. तेव्हा आपलाच कारखाना सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करणार आहे. त्यामुळे सभासदांनी चालू गळीत हंगामापुरता विचार न करता आपल्याच कारखान्याला ऊस गळितास द्यावा, असे आवाहन काटे यांनी केले आहे.





