Pune District: लोणी काळभोरसह जिल्ह्यात 10 ठिकाणी होणार अग्निशमन केंद्र

लोणी काळभोर : पूर्व हवेलीत शहरीकरण, नागरीकरण व औद्योगिकीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आगीच्या छोट्या-मोठ्या घटना वारंवार घडत आहेत. हडपसर आणि वाघोली येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत नागरिकांचे मोठे नुकसान होते. यामुळे पूर्व हवेलीत आग लागून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने लोणी काळभोर, केडगावसह जिल्ह्यात 10 ठिकाणी अग्निशमन केंद्र मंजूर केले आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात येणार्या गावांच्या सुरक्षिततेसाठी दहा ठिकाणी अग्निशमन केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. या केंद्रांसाठी जागा निश्चित होत नव्हत्या; मात्र आता जागा निश्चितीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. जागा निश्चितीसाठी ’पीएमआरडीए’कडून जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव दिला आहे.
दौंड, खेड, मुळशी, शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. तर सर्वाधिक जास्त केंद्रे हे हवेलीमध्ये तीन आणि मावळ तालुक्यात दोन होणार आहेत. ’पीएमआरडीए’च्या हद्दीमध्ये 814 गावांचा समावेश आहे. औद्योगिक वसाहती, त्यामुळे वाढत्या नागरीकीकरणामुळे अग्निशमन केंद्रांची अत्यंत आवश्यकता होती. सध्या जिल्हाधिकार्यांना जागेसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
जिल्हाधिकार्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर तातडीने केंद्रांच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामांसाठी दीडशे कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एखादी मोठी दुर्घटना घडली, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून अग्निशामक विभागाच्या गाड्या बोलवाव्या लागतात. त्यासाठी ग्रामीण भागात जागा निश्चित करून त्या मिळवण्यासाठी ’पीएमआरडीए’चे प्रयत्न सुरू आहेत.
येथे होणार केंद्र्र
अग्निशमन दलाची केंद्रे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, दौंड तालुक्यातील केडगाव, मावळ तालुक्यातील कान्हे, पाटण, पुरंदर मधील दिवे, मुळशीतील महाळुंगे व खेड तालुक्यातील येलवाडी येथे होणार आहेत.





