माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गुरूवार (दि. १२) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार, चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्यात तिरंगी लढत होणार, याची उत्सुकता लागली आहे. शरद पवार यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. तावरे गटाने कार्यक्षेत्र पिंजून काढून राजकारणातील वातावरण ढवळून काढले आहे. माळेगावची अंतिम उमेदवारी (दि.१२) ठरणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंंत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. माळेगावच्या शिवारात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध गुरु- शिष्य अशी लढत होणार आहे. त्यातच शरद पवार गटातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी देखील शरद पवार यांची भूमिका मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे. (दि. १२) रोजी अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे कोण अर्ज माघारी घेणार कोण, तिरंगी की दुरंगी लढत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार हे उमेदवारी अर्ज कायम ठेवतील, अशी अटकळ बांधली जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील गावनिहाय कारखान्याचा लेखाजोखा मांडला जात आहे. तसेच कारखान्यावरील कर्जाचा कळीचा मुद्दा ठरत आहे. सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी सत्ताधारी गटावर टीकेची झोड उठवत कारखान्यातील वाढलेला कर्जाचा मुद्दा सभासदांच्या समोर मांडत आहेत. शरद पवार गटातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बारामतीत गोविंद बाग येथे याबाबत शरद पवार यांच्या समवेत एक बैठक झाली. मात्र, बैठकीत कोणती भूमिका पवार यांनी स्पष्ट केले नाही. शरद पवार हे (दि.१२) पर्यंत भूमिका स्पष्ट करणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे निवडणुकीत शरद पवार यांनी सस्पेन्स वाढविला आहे. तिरंगी लढत कोणाच्या पथ्यावर माळेगावच्या निवडणुकीत शरद पवार यांचा गट तटस्थ राहणार की निवडणूक लढणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय प्रजास्वराज्य पक्षाचे दशरथ राऊत यांनी देखील माळेगाव कारखान्याचे निवडणुकीत उडी घेतली असून शेतकरी कष्टकरी पॅनलच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. नीलकंठेश्वर व सहकार बचाव पॅनलमध्ये खरी लढत होणार आहे, अशी चर्चा होत आहे. शरद पवार यांच्याकडे बारामतीत पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला आहे. शरद पवार गटाने निवडणूक लढविल्यास मतफुटीचा फायदा कोणाला होणार, यावर चर्चेचे खलबते सुरू आहेत.