Pune District : खडकवासलाच्या आवर्तनामधून पाझर तलाव भरून द्या

कळस : येथील परिसरात शेतीच्या पाण्याच्या प्रश्ना बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
त्यामुळे खडकवासला कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या आवर्तनामधून परिसरातील सर्व पाझर तलाव, छोटे मोठे बंधारे पाण्याने भरून द्यावेत अशी मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे. याबाबतचे पत्र नुकतेच ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना दिले आहे. परिसरातील विहिरी, बोरवेलने तळ गाठला आहे.
त्याचबरोबर उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी देणे शेतकर्यांना कठीण बनले असून शेतकर्यांच्या डोळ्यासमोरून शेतातील उभी पिके अक्षरशः पाण्याअभावी जळून चालली आहेत. त्याच बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
त्यामुळे परिसरातील पाझर तलाव व छोट्या, मोठ्या बंधार्यात पाणी सोडल्यास काहीअंशी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्याचबरोबर कालव्यालगतच्या काही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होऊन काही अंशी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
त्यामुळे जलसंपदा विभागाने दक्षता घेऊन परिसरातील पाझर तलाव छोटे, मोठे बंधारे पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी परिसरातील कालव्या लगतच्या सर्वच शेतकर्यांमधून होत आहे.





