पुणे जिल्हा : बारामतीच्या ज्येष्ठ व युवा पदाधिकाऱ्यांची फिल्डिंग

राज्यपालनियुक्त आमदार, महामंडळासाठी पदाधिकारी सक्रिय
बारामती : महामंडळाच्या निवडीबाबत मुंबईमध्ये हालचालीना वेग आला आहे विधानसभा महिन्यावर येऊन ठेपली असताना राज्यपाल नियुक्त आमदार व गेली पाच वर्षे सगळेच महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या असल्यातरी आता या निवडीच्या चर्चा जोर धरताना दिसत आहेत बारामती तालुक्यातील ज्येष्ठ व युवा पदाधिकारी आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत.
अजित पवार हे बारामतीत असताना जिल्हा पारिषदेचे माजी अध्यक्ष असलेले बारामती तालुक्यातील ज्येष्ठ नेते विश्वासराव देवकाते यांनी शक्तिप्रदर्शन करीत विधानपरिषदेची मागणी केली. राष्ट्रीय समाज पक्षातून 2018 साली राष्ट्रवादीत घेतलेले किशोर मासाळ यांना अजित पवार यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष्य पदावर काम करण्याची संधी दिली.
परंतु सरकार आल्यावर किशोर मासाळ यांनी धनगर समाजासाठी मोठं मोठी आंदोलने केली असल्याने त्यांनी धनगर समाजासाठी असलेले शेळी मेंढी महामंडळच्या अध्यक्षपदाची ठाकरे व अजित पवार सरकारकडे केली होती. पण करोनाच्या संकटात या निवडी रखडल्या होत्या. आता परत नियुक्त्या होण्याच्या चर्चाना उधाण आल्याने किशोर मासाळ यांनी देखील आपली जुनीच मागणी परत लावून धरली आहे.
मासाळ आक्रमक चेहरा
मासाळ हे आक्रमक धनगर आंदोलनातील युवा नेते म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत, युती सरकारच्या काळात लोकसभेच्या माजी सभापती सुमेत्रा महाजन यांची सभा उधळ्याने त्यांना एक महिना तुरुंगावास झाला होता. त्या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर अधिवेशनात लक्ष्यावेदी करून किशोर मासाळ यांना उघडपणे जोरदार सहकार्य केले होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे नेते म्हणून अजित पवार यांचे महाराष्ट्रभर कौतुक झाले होते.
पंढरपुरचे आंदोलन महायुतीपुढे डोकेदुखी
आता महायुती सोबत अजित पवार गेल्यावर विश्वास देवकाते व किशोर मासाळ यांनी अजित पवार यांच्या भूमिकेसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आता अजित पवार हे कोणाला संधी देणार याची चर्चा होत आहे. दोन्ही नेत्यांना संधी देऊन धनगर समजला राज्यभर काम करण्याची संधी देतील, हे येणाऱ्या काळात समजेल. पण पंढरपूर येथे सुरु असलेले धनगर समाजाचे उपोषण आणि आरक्षणाची मागणी हे सगळेच मुद्दे येत्या विधानसभा निवडणुकीत युती सरकारची डोकेदुखी ठरणार आहेत.





