Pune District: अवकाळीच्या धास्ती; उन्हाळी बाजरी कापणील वेग

ओतूर : मे महिन्यात तापमान वाढून उन्हाळी बाजरीच्या कापणीला पोषक हवामान मिळेल, अशी बळीराजाची अपेक्षा होती. मात्र, मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलक्याशा अवकाळी पावसाच्या सरीमुळे ओतूर ता. जुन्नर) परिसरातील शेतकर्यांकडून उन्हाळी बाजरीचे पीक सुरक्षित ठेवण्यासाठी पीक कापणीच्या कामात बळीराजा व्यस्त झाला आहे. दरम्यान, हवामान यंदा पोषक राहिल्याने पिकांची वाढ सुरळीत झाली असून कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे दाण्यांचा दर्जाही चांगला राहिला आहे.
उन्हाळी बाजरी हे अल्प कालावधीतील, कमी पाण्यात येणारे आणि खर्चावर नियंत्रण असलेले पीक असल्यामुळे ओतूर परिसरातील अनेक शेतकरी याकडे वळले आहेत. विशेषतः फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून ही बाजरी यशस्वी ठरते. यावर्षी उन्हाळी बाजरीचे उत्पादन समाधानकारक असून, पिकाची वाढ वेळेवर झाली. कमी खर्चात जास्त उत्पादन देणार्या या पिकामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कापणीसाठी काही ठिकाणी यांत्रिक साधनांचा वापर होत असून, दाणे वाळवून साठवणुकीचीही तयारी सुरू आहे.
मात्र, ढगाळ हवामानामुळे वाळवण थांबवावे लागत असल्याने बळीराजाला काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कृषी विभागाने शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन देत साठवणुकीसाठी उंच जागा, प्लॅस्टिक पत्रे व दररोज ढेकाळणी यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक बाजारात बाजरीला समाधानकारक दर मिळण्याची शक्यता असून, काही शेतकर्यांनी थेट बाजारात विक्रीसाठी माल नेण्यास सुरुवात केली आहे.
शेतकर्यांना भीती
शेतकर्यांचे म्हणणे आहे की, हवामान अजूनही ढगाळच राहिल्यास वाळवण आणि साठवणुकीस अडथळा येऊ शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी सतर्क राहून वेळेवर कापणी व योग्य साठवणुकीस प्राधान्य द्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.





