भिगवण – पुणे – सोलापूर महामार्गावर भिगवणजवळील डाळज नं 1 (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. मंगळवारी (दि. 02) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळत असून हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी गाडीने तीन चार पलट्या मारल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. रफिक कुरेशी (वय 34), इरफान पटेल (वय 24), मेहबूब कुरेशी (वय 24), फिरोज कुरेशी (वय 28), फिरोज कुरेशी (वय 27, सर्व रा. नारायनखेड, ता. जि. मेडक, तेलंगणा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल अमीर (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सहा तरुण मुंबईला फिरायला बलेनो गाडीमधून गेले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर गावी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत निघाले होते. दरम्यान सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे डाळज नं. तीनच्या हद्दीतील सुजाता पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने वेगाने असणारी बलेनो कार खड्ड्यात जोरात आदळली. कार खड्ड्यात आदळल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने तब्बल तीन चार पलट्या मारल्या. यामध्ये गाडीत असलेले पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी भिगवण आयसीयू या दवाखान्यात आणण्यात आले; परंतु त्यातील पाच तरुणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती पुढील उपचार सुरु करण्यात आले आहेत.