पुणे जिल्हा : शेतकऱ्यांचा ऊस लवकर नेणार : शिंदे

जोगवडीत शेतकऱ्यांशी चर्चा
मोरगाव – बारामती तालुक्यातील जोगवडी येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे यांनी भेट केली. येथील दुष्काळी स्थितीची पाहणी करून सोमेश्वर कारखान्याचे वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस लवकर नेणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली.
बारामती तालुक्यातील जोगवडी येथे भैरवनाथाचे पुरातन मंदिर असून येथील ग्रामदैवत आहे. हे मंदिर 18 व्या शतकातील आहे. या मंदिराच्या पुरातन सभा मंडपास मोठ मोठे तडे गेले असून मंदिर पाहणी राजवर्धन शिंदे यांनी केली.
यावेळी सुनील राजेभोसले, सुनील शिंदे, पृथ्वीराज शिंदे, धनंजय भोसले, डॉ. सतीश राजेभोसले, शांताराम भोसले, हनुमंत जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी मंदिरासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली.
इमारतीच्या पाहणीनंतर सोमेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील दुष्काळी स्थितीची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीस देण्यासाठी पाणी नसल्याने तसेच यंदा पाऊस कमी असल्याने बागायती पट्ट्याची तुलनेने या भागातील ऊस लवकर नेण्याची विनंती केली . यावर शिंदे यांनी ऊस लवकर येण्याची ग्वाही त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली.





