Pune District : राजगड तालुक्यात शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली

– मुसळधार पावसाने तालुक्यातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले
विंझर – यंदा पावसाने कहर केला असून वेल्हे (राजगड) तालुक्यामध्ये मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांची भात लागवडीसाठी केलेली भात पिके पाण्याखाली गेली आहेत. तर काही शेतकऱ्यांचे बांध फुटून पिके वाहून गेली आहेत. याचा सर्वात मोठा फटका वेल्हे (राजगड) तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.
वेल्हे (राजगड) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, गुंजवणी धरण क्षेत्र परिसर, पानशेत परिसर, वेल्हे पूर्व परिसर, वेल्हे पश्चिम परिसर या भागांमधील काही गावांमध्ये पाणी साचल्याचे आढळून आले आहे.
काही भागात ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे वेल्हे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
या रिपरिपीमुळे वेल्हे (राजगड)तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.





