पुणे जिल्हा : नाग चावल्याने शेतकर्याचा मृत्यू

लोणी काळभोर – आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथे शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या एका 35 वर्षीय शेतकर्याला नागाने दंश केल्याने रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. चित्रसेन पांडुरंग जवळकर (वय 35) असे या तरुण शेतकर्याचे नाव आहे.
चित्रसेन जवळकर हे आळंदी म्हातोबाची येथील श्री म्हातोबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष होते. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक त्यांना नागाने दंश केला. त्यामुळे ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून लोकवस्तीतील नागरिक तत्काळ त्या ठिकाणी हजर झाले.
तोपर्यंत चित्रसेन हे घाबरून बेशुद्ध पडले होते. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी रिक्षातून लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच आळंदी म्हातोबाची परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, भावजय, मुलगा, पुतणी, पुतण्या असा परिवार आहे.





