पुणे जिल्हा : मांडवगणमध्ये फराटे कॉलेजची निषेध रॅली

कोलकाता, बदलापूर घटनेविरोधात पथनाट्यातून प्रबोधन
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित फराटे पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून अमानुष खून केलेल्या घटनेच्या निषेधार्थ व बदलापूर येथे दोन निरागस चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी मांडवगण फराटा येथे निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातून निषेध रॅलीची सुरुवात करण्यात आली. “पिडीतेला न्याय द्या”,”गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे”,आदी घोषणा देत पुण्याई गार्डन परिसारत निषेध रॅलीचे रूपांतर निषेध सभेत झाले. विद्यार्थीनिनी महिला सबलीकरण यावरपथनाट्ये सादर केली. पथनाट्यातून व मनोगताने उपस्थितांची मने हेलावून टाकली. रॅलीत विद्यार्थिनींनी समाजाला प्रश्न केला. निषेध रॅली श्री वाघेश्वर मंदिर परिसरात पोहोचली असता कोलकाता येथील पिडीतेला सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थीनिनी कोलकातातील गुन्हेगाराच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, संस्थापक सचिव मृणाल फराटे पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शितोळे, उपप्राचार्य प्रा. प्रवीण कुरुमकर, प्राचार्य संदीप कोकरे, प्राचार्य डॉ. विवेक सातपुते, प्राचार्य डॉ. अमोल कदम, फराटे पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले.
नितीमूल्यांची शिकवण मुलांना देण्याची गरज
संस्थापक सचिव मृणाल फराटे पाटील म्हणाल्या की, नैतिकता, नितीमूल्य यांची शिकवण व जाणीव कायम प्रत्येक कुटुंबातील मुलींना पावलोपावली करून दिली जाते. मोठ्याने हसू नये, वेळेत घरी येणे, अंग भरून कपडे वापरणे ही बंधने मुलींनाच घातली जातात. आपल्या कुटुंबाची वडिलाची अब्रु जाऊ नये म्हणून मुलीदेखील वरील सर्व बंधनाचे पालन करतात. तरीदेखील देशात विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून अशा प्रकारचे अत्याचार वारंवार होत आहेत. फक्त निषेध करुन उपयोग नाही. अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नैतिकता, नितीमूल्यांची शिकवण मुलींना नव्हे तर मुलांना देखील देण्याची गरज आहे”





