पुणे जिल्हा : सामूहिक बलात्काराचा बनाव उघड

बारामतीत अल्पवयीन मुलीकडून प्रकार
बारामती – एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा बनाव रचल्याचा प्रकार बारामतीत घडला. याबाबत पोलीसांनी तातडीने तपास केल्याने सत्य प्रकार उघड झाला.
एका अल्पवयीन मुलीने ही घटना सामाजिक कार्यकर्ते मच्छींद्र टींगरे यांना रडत रडत फोन करुन सांगितली. त्यानंतर टींगरे यांनी हा प्रकार तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना ही घटना कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळी जात संबंधित मुलीला ताब्यात घेतले. संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोहचली.
याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या ‘ओएसडी’मार्फत ही घटना पोहोचली. त्यांनीही तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना सर्वांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने या मुलीकडे तपास सुरु केला, तेव्हा तिच्या प्रत्येक वेळेसच्या उत्तरात काही वेगळेच पुढे येत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी मुलगी काहीतरी वेगळच सांगून दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी महिला पोलीस कर्मचारी व अधिका-यांची मदत घेत मुलीला विश्वासात घेतले.
त्यानंतर सत्य प्रकार पुढे आला. अल्पवयीन मुलीकडूनही अशी दिशाभूल व बनावाचा प्रकार पोलिसांनाही चक्रावून सोडणारा ठरला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दाखविलेल्या प्रसंगावधानाचे काैतुक होत आहे.
टीव्हीवरील मालिका पाहून बनाव रचला
पोलिसांना गोंधळात टाकणारी ही मुलगी तिच्या नवीन मित्रासोबत बोलत होती. हे एका जुन्या मित्राला आवडत नव्हते. त्या मित्राला जेलमध्ये पाठविण्याच्या उद्देशाने त्या दोघांनी हा बनाव रचल्याचे अखेर स्पष्ट झाले. असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. एका मालिकेतील घटना बघून हे केल्याचे संबंधित मुलीने सांगितले.





