पुणे जिल्हा : चंदुकाकांच्या विचारांना विश्वास कायम ठेवावा

संजय जगताप : संत सोपानकाका बँकेचा २७ वा वर्धापनदिन थाटात
सासवड – श्री संत सोपान काका सहकारी बँकेचे संस्थापक स्व. चंदुकाका जगताप यांनी घालून दिलेली सहकारातील शिस्त आणि कामाच्या पद्धतीप्रमाणे संत सोपानकाका सहकारी बँक कार्यरत आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार यांच्या विश्वासामुळे बँक सक्षमपणे उभी आहे. संस्थेचा कारभार काटेकोर आणि पारदर्शीपणे करून त्यात वाढ होत असून स्व. चंदुकाकांच्या विचारांना हाच विश्वास कायम ठेवावा, असे बँकेचे माजी अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानकाका सहकारी बँकेचा २७ वा वर्धापनदिन झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेच्या सासवड येथील शाखेत श्रीसत्यनायायण पूजेचे आयोजन केले होते. याप्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा फूले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे म्हणाले की, २७ वर्षांपूर्वी ६ लाख रुपयांच्या भांडवलावर ही बँक सुरु झाली होती. (दि.२७) अखेर बँकेच्या एकूण ठेवी ७५२ कोटी ३२ लाख रुपये, कर्ज वाटप ४५१ कोटी ९ लाख रुपये, भाग भांडवल रुपये २८ कोटी २५ लाख, बँकेचा एकूण नफा (तरतूदी पूर्वीचा) रुपये ७ कोटी ६२ लाख, भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण १७.०८ टक्के, ढोबळ निष्क्रिय जिंदगीचे प्रमाण २.८७ टक्के तर निव्वळ निष्क्रिय जिंदगीचे प्रमाण शून्य टक्के आहे. बँकेचे सासवड येथील नोंदणीकृत कार्यालय, टिळक रोड येथील प्रशासकीय कार्यालय, वाशी, सिंहगड रोड व हांडेवाडी या शाखा स्वमालकीच्या जागेत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, उपाध्यक्ष शिवाजी ढमढेरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, संचालिका राजवर्धिनी जगताप, संचालक मनोहर पवार, राजेंद्र बडदे, विजय थेऊरकर, रवींद्र जोशी, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे, अधिकारी चंद्रशेखर जगताप, गणेश मोहोळ, विश्वजीत आनंदे, शाखा व्यवस्थापक सचिन जगताप, सर्व संचालक, अधिकारी, शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, सभासद ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.
दिवसभर शुभेच्छांसाठी ग्राहकांची रीघ
दिवसभरात बँकेचे सर्व संचालक, सल्लागारांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्राहकांनी भरभरून शुभेच्छा देत बँकेविषयी प्रेम व्यक्त केले. बँकेने गृहतारण कर्जाचा व्याजदर ९ टक्के तर वाहन तारण कर्जाचा व्याजदर ९ टक्के केला आहे. महिलांसाठी सर्व प्रकारच्या ठेवींवर अर्धा टक्का जास्त व्याजदर याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.





