Pune District : तोतया तृतीयपंथीयांकडून उकळी जातेय खंडणी

नीरा : पुरंदर तालुक्यातून जाणार्या पुणे-पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे पुणे-मिरज लोहमार्गाच्या गेटवर तृतीयपंथीयांचा वेश धारण करून काही लोक वाहन चालकांची पिळवणूक करत आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना वाहनांची गती कमी झालेली असते, अशावेळी अचानक वाहनांसमोर उभे राहून हे तृतीयपंथी वेषधारण केलेले लोक वाहनचालकांकडून खंडणी उकळत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी आता वाहन चालकांकडून होत आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे तृतीयपंथी असल्याचे भासवून अनेक लोक महिलांच्या वेश परिधान करून सर्वसामान्य लोकांकडून दहा रुपयांपासून ते शंभर रुपयापर्यंत खंडणी वसूल करत आहेत. काही लोक आठवड्याला, काही लोक महिन्याला,(अमावस्या,पौर्णिमा) तर काही लोक दररोजच अशा प्रकारची खंडणी गोळा करत आहेत. मात्र, देव भोळेपणामुळे किंवा या लोकांच्या भीतीमुळे कोणीही तक्रार करायला पुढे येत नाही. याचाच गैरफायदा घेत नीरा शहरामध्ये आता तृतीयपंथीय वेश धारण केलेल्या लोकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भविष्यात नीरा येथे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.
नीरा हे शहर पुरंदर तालुक्यात जरी असले तरी बारामती तालुक्याला लागूनच आहे. पुरंदर तालुक्यात अंधश्रद्धेचे मोठे प्रस्थ माजले आहे. त्यातच बारामती तालुक्यातून त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. बारामती तालुक्यातील निंबूत आणि परिसरामध्ये अशा लोकांना दिक्षा देणार्या बुवा,बाबा आणि गुरूंचा सुळसुळाट झाला आहे. हे गुरू वेगवेगळ्या भागातून येणार्या अशा लोकांना दीक्षा देतात. त्यांना नीरा शहरात वास्तव्यासाठी जागा देतात आणि नंतर त्यांना भिक्षा मागायला पाठवतात. या भिक्षेतील काही भाग गुरुलाही देण्याची परंपरा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भिक्षा गोळा करण्यासाठी या गुरु शिष्यामध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर होत आहे.
साडी नेसून हातात बांगड्या घालून लोकांसमोर टाळ्या वाजवून त्यांना घाबरवून त्यांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही. या लोकांच्या त्रासाला नीरा येथील व्यावसायिक देखील कंटाळले आहेत. एखाद्याला पैसे दिले नाहीत तर हे लोक दुकानदाराला बददुवा देऊन पुढे निघून जातात. त्यामुळे नको यांच्या नादाला लागायला म्हणून लोक पैसे देतात. मात्र असे पैसे घेताना एवढेच द्या, तेवढेच द्या, असे म्हणून देखील त्या दुकानदाराला त्रास दिला जातो.
सरकारच्या जादूटोणा विरोधी कायद्याचा धाक नाही
नीरा आणि परिसरामध्ये सध्या देवऋषी,बुवा, बाबांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दररोज अंगात येणे देवाची थापणूक, करणी बाधा काढणे, देवापुढे पशु बळी देणे असे अंधश्रद्धेचे, जादूटोणाचे प्रकार राजरोस सुरु आहेत. मात्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. जादूटोणा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये असे कक्ष स्थापन करण्यात आले नाहीत.
एखाद्याच्या घरामध्ये तृतीयपंथी मुल जन्माला आल असेल तर त्या कुटुंबाने त्याचा इतर मुलांप्रमाणे स्वीकार करायला हवा. इतर मुलांप्रमाणेच त्यालाही शिक्षण द्यायला हवे. अशा मुलांना पुढे नोकरीच्या देखील संधी आहेत. मात्र केवळ लिंगावरून त्याच्यावर भेदभाव किंवा अन्याय व्हायला नको. मात्र असा एखादा व्यक्ती एखाद्या कुटुंबात जन्माला आला असेल तर त्याच्या घरच्यांना भीती दाखवून त्याला जबरदस्ती साडी नेसायला लावून भीक मागायला लावणे किंवा एखाद्या पंथाची दीक्षा घ्यायला लावणे, त्याच्यावर त्यासाठी जोर जबरदस्ती करणे किंवा कुटुंबीयांना भीती दाखवणे हा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो.
– नंदिनी जाधव, सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारिणी
या लोकांना या ठिकाणी उभे राहू नका म्हणून वारंवार समज दिली आहे. मात्र यानंतर काही दिवस गेल्यानंतर पुन्हा हे लोक असाच प्रकार करतात. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केले जाईल. संबंधित गुरु किंवा त्यांना या परिसरात आणणार्या लोकांची देखील चौकशी केली जाईल. यातील कोणी जर गुन्हेगारी कृत्यांमध्ये आढळून आले तर त्यांना या गावांमध्ये आणणार्या लोकांवर देखील कठोर कारवाई केली जाईल. यापुढे वाहनचालकांना त्रास दिल्यास लोकांनी यासंदर्भात पोलिसांकडे फिर्याद द्यावी.
– दीपक वाकचौरे, प्रभारी अधिकारी, जेजुरी पोलीस ठाणे





