पुणे जिल्हा : आळंदीत आपत्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती

डॉ. इंदिरा पारखे : कार्तिकी यात्रेत भाविकांच्या आरोग्य सेवेस प्राधान्य
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीतील कार्तिकी यात्रा यावर्षी भाविकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेस प्राधान्य देत साजरी होणार आहे. यासाठी राज्य शासनाचे आरोग्य विभागाने प्रशासकीय तयारीसह पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि औषध पुरवठ्याचे नियोजनास प्राधान्य दिले असून आपत्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.
यावर्षी माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे 750 व्या जन्मोत्सवी वर्षात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि परंपरांचे पालन करीत साजरा होत आहे. या सोहळ्यात राज्य परिसरातून आळंदीत आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आरोग्य विभागाचे माध्यमातून यात्रा काळात 24 तास आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ. विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात 24 तास आरोग्य सेवा बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभागाचे माध्यमातून सुरु राहील. लाखो भाविकांची गर्दी लक्षांत घेऊन अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी वृंद मागविण्यात आला आहे. यात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिक, परिचर, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, क्ष किरण तंत्रज्ञ , आंतरवासी विद्यार्थी यांचा समावेश आहे.
अनेक वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांचा समावेश तीन सत्रात 24 तास सेवा देण्यासाठी समावेश आहे. या शिवाय आवश्यकते नुसार जास्तीच्या रुग्णवाहिकां यावेळी तैनात ठेवण्यात येणार आहे. शहरात बाह्य रुग्ण विभाग चाकण चौक, दर्शनबारी, वडगाव रस्ता, माऊली मंदीर, इंद्रायणी नदी घाट परिसर आदी ठिकाणी यात्रेसाठी बाह्य रुग्ण विभाग कार्यरत रहाणार आहे. यासाठी प्रत्येक बाह्य रुग्ण विभागात दोन डॉक्टर्स, दोन अधिपरिचारिका, एक शिपाई कर्मचारी यात्रा काळात कार्यरत राहतील.
आळंदी परिसरात पाणी शुद्धीकरण मोहीम
यात्रा कालावधीत आळंदी शहर परिसरात जिल्हा आरोग्य अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्गदर्शनात आळंदी परिसरात पाणी शुद्धीकरण मोहीम, कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यात सार्वजनिक हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना, खाद्य पदार्थ यांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक काम पाहणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.





