Pune District : अतिक्रमणे हटविणार!

उरुळी कांचन : हडपसर ते यवत या दरम्यानच्या अतिक्रमणासह पुणे शहराच्या सभोवताली असलेल्या महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारपासून (दि. 3) कारवाई करण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत तसेच राज्यमार्गावरील उरुळी कांचन ते शिंदवणे दोन्ही बाजूंनी करण्यात आलेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणेच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे वेळापत्रक पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व विभागांशी समन्वय साधून पुढील 30 दिवसांत ही कारवाई सुरू ठेवून महामार्ग मोकळे करण्यात येणार आहेत. त्यांची सुरुवात सोमवारपासून करण्यात येणार आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. या महामार्गाच्या हद्दीमध्ये 8 किमी ते 252.350 किमी म्हणजे हडपसर ते सोलापूर या दरम्यान लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. तर, वारंवार कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. तसेच या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची अतिक्रमणे काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी-पाटील, अधीक्षक भूमी अभिलेखाच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतूक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, पुणे शहर सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वम्याणी, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शंकर पाटील, मीनल पाटील, संतोष जाधव, बी. के. गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे सह शहर अभियंवा हरियाल नरेश, एमआयडीसीचे उपअभियंता प्रकाश पवार, पुणे मनपाचे उप अभियंता महेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्पेश लहिवाल, एमआयडीसीचे एम. एस. भिंगारदिवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महामार्गावर वाहतूक कोंडी होणार्या विविध भागांत पुढील 30 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेली दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. यापुढील काळात वर्षातून दोन वेळा अशा प्रकाराच्या कारवाईचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत
-डॉ. योगेश म्हसे, आयुक्त पीएमआरडीए
शेवाळवाडीतील अतिक्रमण निघणार का?
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यापारी व व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. यामध्ये हडपसर, 15 नंबर, शेवाळेवाडी, येथील चिकन, मटणाच्या अनधिकृत टपर्या वाढल्या आहेत. या टपर्या निघणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन चौक, लोणी कॉर्नर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनमधील एलाईट चौक, तळवडी चौक या ठिकाणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापैकी सुमारे 70 टक्के अतिक्रमणामुळे रस्त्यातील वाहतुकीला आडकाठी ठरत आहे.





