पुणे जिल्हा : पुरंदरमध्ये होणार ओबीसीची एल्गार सभा

सासवड येथे ओबीसी समाजाच्या बैठकीत निर्णय
सासवड – पुरंदर तालुक्यातील ओबीसी व बहुजन समाजामध्ये आरक्षणाची जनजागृती करण्याबरोबरच ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पुरंदर येथे आयोजित करण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची निर्मिती करावी. परंतु ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये; अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष अनिल लडकत यांनी दिला.
सासवड (ता. पुरंदर) येथील नेताजी चौकामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक झाली. त्यावेळी लडकत बोलत होते. लडकत पुढे म्हणाले की, (दि.28) रोजी महात्मा फुले वाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास ग्राहक संरक्षण अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार संजय आवटे यांना समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे लडकत यांनी सांगितले.
बैठकीमध्ये पुरंदर तालुका ओबीसी आरक्षण बचाओ समितीची स्थापना करण्यात आली. संपूर्ण तालुका ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा करू, असे आबा भोंगळे यांनी सांगितले.
ओबीसी व मराठा समाज प्रत्येक गावात गुण्या गोविंदाने नांदत असताना मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे. दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये, असे राहुल गिरमे यांनी सांगितले.
यावेळी समता परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गिरमे, निलम होले, सुहास लांडगे, राहुल गिरमे, विजय वढणे, संतोष गिरमे, रोहिदास कुदळे, किसन वाघोले, किशोर वचकल,
सागर जगताप, गणेश कोरपड, राजेंद्र बरकडे, नितीन राऊत, सचिन भोंगळे, श्रीकांत टिळेकर, ज्योती वानखेडे, स्वाती वानखेडे, चंद्रकांत हिवरकर, सुभाष हिवरकर, योगेश जांभुळकर, संजय टिळेकर, शरद चौखंडे, भारत चौखंडे, मनोज मेहत्रे, नितीन भोंगळे, मंगल मेह्त्रे, शितल बनकर, प्रिया जगताप, संदीप राऊत, हिरामण हिवरकर, राहुल राऊत, गिरीश गिरमे, रुपेश मेह्त्रे, आप्पा होले, आदी मान्यवर उपस्थित होते.





