पुणे जिल्हा : दूध दरवाढीसाठी एल्गार

तरडोलीत सागर जाधव यांचे उपोषण सुरूच
मोरगाव – बारामती तालुक्यातील तरडोली येथे उपसरपंच सागर पंडित जाधव यांनी दुधाला प्रति लिटर 42 रुपये हमीभावासहित विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. यापूर्वी केलेल्या उपोषणानंतर शासनामार्फत आश्वासन देऊनही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
उपसरपंच जाधव या युवा शेतकऱ्याने (दि.1) ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर यादरम्यान दुधाला प्रतिलिटर 42 रुपये भाव मिळण्यासाठी उपोषण सुरू केले होते. राज्य सरकारने राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली दूध समिती स्थापन केली होती. यानुसार अध्यादेश काढला होता. मात्र, याप्रमाणे दूध दर दिला जात नाही. त्यामुळे जाधव यांनी उपोषण सुरु केले होते.
त्यावेळी बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांनी मध्यस्थी करीत त्यांना आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले होते. तहसीलदार शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने जाधव यांनी (दि.6) पासून पुन्हा उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.
याबाबत तालुक्यातील विविध शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. जोपर्यंत राज्य शासन दुधाला 42 रुपये हमीभाव देत नाही. तसेच इतर मागण्या पूर्ण करीत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.





