पुणे जिल्हा : उत्रौली-कारी गटात वाजले निवडणुकांचे बिगूल

उत्रौली कारी गटात जि. प.ची रंगीत तालीम
वीसगाव खोरे – भोर तालुक्यातील 2023 या चालू वर्षात कार्यकाल संपणाऱ्या 27 सार्वत्रिक तसेच 19 पोटनिवडणुका अशा 46 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 16 आक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
उत्रौली कारी या जिल्हा परिषद गटातील बहुतांशी ग्रामपंचायती असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका विचारात घेऊन रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. विविध पक्षांच्या वतीने गावागावांतून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने आणि भूममिपूजनावर भर दिला आहे.
यातून गावागावांत पक्षाची ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमात पक्षप्रवेशांचा धडाका सुरु आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीतून नेत्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची रंगीत तालीम म्हणून सावध पवित्रा घेत आपल्या गटाचे सदस्य जास्तीत जास्त निवडून आणण्याची यशस्वी रणनीती आखत आपल्या गावातील सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. इच्छुक उमेदवार गावातील हालचालींवर लक्ष केंद्रित करून आपला प्रभाव गावात वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका
उत्रौली-कारी गटातील वीसगाव खोऱ्यातील वरोडी डायमुख, वरोडी बुद्रुक, पळसोशी, वरोडी खुर्द तसेच खोरे, हिरडस मावळ खोऱ्यातील हिर्डोशी, कोंढरी, वारवंड, शिरगाव, शिळिंब, आशिंपी, शिरवली हिमा, दापकेघर, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, रायरी, साळव, जयतपाड, टिटेघर, वडतुंबी, आंबवडे, नाटंबी, करंजे.
गावबैठकीत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न
काही गावांत गावबैठकीत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी वेग आला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय गट निवडणुका प्रतिष्ठा पणाला लावून लढणार आहेत. ही निवडणूक प्रत्यक्ष पक्ष चिन्हावर लढविली जाणार नसली, तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच सत्ता यावी, म्हणून प्रयत्नशील आहेत. यात प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात रंगत पाहायला मिळणार असून भाजप, शिवसेना यांच्या भूमिकेकडे जाणकारांचे लक्ष आहे.





