पुणे जिल्हा : वळसेंच्या पक्षप्रवेशाला डिंभेच्या पाण्याची “किनार’

वळसेंचा मुद्दा : आरोप- प्रत्यारोप सुरू राहणार
संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती –राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीने राज्यभराचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या छावणीत सहभागी झाले. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पक्षफुटीनंतर आता डिंभे धरणाच्या पाण्याबाबतचा मुद्दा सांगितला जात आहे. त्यामुळे आता डिंभा धरणाचे पाणी पक्षप्रवेशानिमित्ताने समोर आला आहे. डिंभेच्या पाण्यावर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.
शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांना साथ दिल्याने राज्यभरात चर्चांना उधाण आले होते. वळसे पाटील चुकले. त्यांनी शरद पवारांची साथ सोडायला नको होती. यावर त्यांना सोशल मीडियावर टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागले आहे. वळसे पाटील यांना शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचा बरोबर जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी व्हावे लागले आहे. याबाबत समाजमाध्यमांमध्ये व जनतेमध्ये चर्चा चालू होत्या. मात्र, वळसे पाटील यांचे राजकिय विरोधक व जुने मित्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करीत तालुक्याच्या विकासासाठी वळसे पाटील यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
डिंभेच्या पाण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या काळातील होता. त्यावेळी हा वाद पेटला होता. मात्र, दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हा डिंभ्याच्या पाण्याचा विषय काही काळ थांबला होता. मात्र, काही काळानंतर या विषयाने पुन्हा उचल खाल्ली आहे. परिमाणी ज्या शिरुर व आंबेगाव तालुक्यांची दुष्काळी तालुके अशी ओळख पुसण्याचे काम वळसे पाटील यांनी केले. त्याच वळसे पाटील यांना तालुक्यातील पाणी बाहेर जाताना पाहायची वेळ आली होती.
डिंभा कालव्यामुळे आंबेगाव व शिरुर तालुक्यातील उत्तरेकडील गावे सुजलाम सुफलम झाली आहेत. त्यातच शिरुर तालुक्यात एक सहकारी व दोन खासगी साखर कारखान्यांमुळे उसाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस नागरिकीकरण वाढत आहे.
त्यामुळे भविष्यात या दोन्ही तालुक्यांनाच शेती व पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे डिंभा धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यात घेऊन जाणे हे येथील शेती व उद्योग, औद्योगीकरण व नागरिकीकरणाचा विचार करता हिताचे ठरणार नव्हते. शरद पवार याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेच वळसे पाटील यांनी शिरुर-आंबेगावच्या जनतेच्या हितासाठी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, डिंभाचा मुद्दा आता ऐरणीवर
आला आहे.
शरद पवारांकडून दुर्लक्ष…
आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात डिंभे धरणाच्या पाण्याबाबतचा विषय छेडला होता. पाइपलाइन अथवा बोगदा पाडून अहमदनगर जिल्ह्यात घेऊन जाण्याचा घाट काही नेत्यांनी घातला होता. त्या दृष्टीने त्यांनी हालचालीही चालू केल्या होत्या. ही बाब दिलीप वळसे पाटील यांना समजताच त्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधून डिंभा धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यात नेऊ नये. ते पाणी शिरुर व आंबेगाव तालुक्यासाठीच गरजेचे व निकडीचे आहे, असे सांगितले. मात्र, शरद पवारांनी वळसे पाटील यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले होते.





