पुणे जिल्हा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा – अंकिता शहा

इंदापूर – स्वच्छ व सुंदर हरित इंदापूर अशी ओळख देशपातळीपर्यंत केवळ इंदापूरकरांच्या सहकार्याने पोहोचली आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबात गणेशोत्सव आनंदाने साजरा होतो. युवक गणेश मंडळे आदर्श निर्माण होईल असा गणेशोत्सव साजरा करतात. याच जोडीला पर्यावरणपूरक गणेश उत्सव इंदापूरकरांनी साजरा करावा, असे आवाहन माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.
इंदापूर शहरातील शहा परिवाराच्या वतीने अंकिता शहा यांच्या निवासस्थानी शनिवारी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, शहा परिवाराचे सर्वेसर्वा मुकुंद शहा, युवा उद्योजक अंगद शहा, रुचिरा अंगद शहा, वैशाली भरत शहा, मालती सुरेश शहा व शहा कुटुंबीय उपस्थित होते.
अंकिता शहा म्हणाल्या, इंदापूर शहराला स्वच्छतेचे महत्व प्रचंड घराघरात पटले आहे. गणेश उत्सव कालावधीत परिसरामध्ये वृक्षारोपण, रक्तदान व सामाजिक उपक्रम राबवणारे शहर म्हणून उत्कृष्ट काम करते. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपला सहभाग नोंदवावा.





