पुणे जिल्हा :पुणे शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार खड्ड्यांत

पुणे -सोलापूर महामार्गाची दुरवस्था : वाहनचालक, नागरिकांतून नाराजीचा सूर
सोरतापवाडी : पुणे शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार हवेली तालुक्यातून चालू होते. पण या प्रवेशद्वाराचा रस्ताच खड्डेमय झाला असून, हडपसरजवळ अनेक ठिकाणी पुणे – सोलापूर महामार्गावर खड्डे पडले आहेत. हे प्रवेशद्वार खड्ड्यात गेल्याचे नागरिकांनी सांगितले.
हवेलीतील हडपसर, शेवाळेवाडी, मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मुळ, उरुळी कांचन इत्यादी भागातून पुणे शहरात जाणारा पुणे -सोलापूर या महामार्गच्या रस्त्यांची दुरावस्था झाली असुन नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे नागरिकांची मात्र गैरसोय होत असल्याने अनेक नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली.
शेवाळेवाडी जवळील कुदळे कार ते लक्ष्मी कॉलनीपर्यंत साडेतीन किलोमीटरचा रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाच्या नावाखाली कामास सुरुवात केली होती; पण हा रस्ता कुणाला खूश ठेवण्यासाठी केला, हेच नागरिकांना कळले नाही. कारण रस्ता दुरुस्तीस सुरुवात करताच आठवड्यात या रस्त्याला खड्डे पडले. अधिकार्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की रस्त्यावरून सतत वाहने जात असल्यामुळे डांबराला सेट व्हायला वेळ मिळत नाही. त्यामुळे रस्त्या वर खड्डे पडत आहेत.
कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी पर्यंत टोल नाका बंद झाल्यापासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर चढउतार असल्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना खूपच त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठत असून दुचाकी वाहन चालकांना याचा त्रास जाणवत आहे. लोणी स्टेशन येथे महामार्गावर तात्पुरती डागडुजी करून सुद्धा खड्डे आहे तसेच आहेत.
तीनही आमदारांनी लक्ष द्यावे
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, हडपसरचे आमदार चेतन तुपे, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी या महामार्गाच्या रस्त्याचा दर्जासंबंधी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. हा पालखी मार्ग असूनसुद्धा दुर्लक्षित झाला आहे. मध्यंतरी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी रस्त्याचा दर्जा सुधारण्यासाठी नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन केले होते; परंतु या निगरगट्ट ठेकेदारांमुळे रस्त्याचा दर्जा खूपच खालावला आहे. त्यामुळे आमदारांनी लक्ष देऊन रस्ता चांगला कसा होईल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सतत पाऊस पडत असल्यामुळे रस्ता तयार करण्यास अडथळा येत आहे. पाऊस उघडला की रस्ता करण्यात येईल.
-श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे
पुणे – सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग आहे; पण तरीही त्याची सध्याची परिस्थिती पाहता तो एखादा आडमार्ग आहे की काय, असे वाटू लागलेय. सत्तेच्या धुंदीत राज्यकर्त्यांचे त्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. महामार्गावर प्रलंबित कामे मार्गी लागली नाही तर मोठे आंदोलन उभारू.
-स्वप्नील कुंजीर, शिवसेना ठाकरे गट संघटक





