पुणे जिल्हा : ब्रेल लिपीत ज्ञानेश्वरी; दृष्टिहीनांचे पारायण

आळंदी – द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दृष्टिहीन बांधवांच्या ब्रेल ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन आळंदी येथील भक्तनिवास सभागृहात पार पडले.
या पारायण सोहळ्याचा उद्घाटन समारंभामध्ये ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण भारस्कर, आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे, डॉ. नारायण महाराज जाधव, संस्थांनचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर, तळेगाव येथील समाजसेवक डॉ. शालीग्राम भंडारी आणि मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गौरवलेले दृष्टिहीन गणपती महाराज जगताप मार्गदर्शन करताना म्हणाले की, ज्ञानेश्वरीची अनेक भाषात भाषांतर झाली मग दृष्टिहीन बांधवांनाही ज्ञानेश्वरी वाचता यावी या उद्देशाने ब्रेल भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली. दरम्यान, उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात पाच दृष्टिहीनांना ब्रेल ज्ञानेश्वरीचे वाटप करण्यात आले. ज्ञानेश्वरी पारायण याचे नेतृत्व अमोल महाराज घाईके, गणपतराव जगताप महाराज यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वरीतील 9, 12, 15, 18 व्या अध्यायाचे पारायण करण्यात आले.
ज्ञानेश्वरीमधून तरुण पिढीसह सर्वांना जीवनात समाधानी राहण्याचा विशेष दृष्टिकोन मिळतो. तसेच आळंदी परिसरातील दृष्टिहीन बांधवांसाठी नगरपालिका पातळीवर विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न राहिल.
– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी





