पुणे जिल्हा : विस्कळीत एसटी सेवेमुळे विद्यार्थी, नागरिकांचे हाल

बससेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
देऊळगाव राजे – दौंड तालुक्याच्या पूर्व भागात विस्कळीत एसटी सेवेमुळे विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे या परिसरातील बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील सिद्धटेक, शिरापूर, देऊळगावराजे, हिंगणीबेर्डी, वडगाव दरेकर, पेडगाव, आलेगाव, खोरवडी आदी गावांतून दौंडला ये – जा करीत असतात. परंतु एसटी महामंडळाच्या काही फेऱ्या बंद असल्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांना फरफट करावी लागत आहे. काही नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी तर विद्यार्थी शाळेसाठी जातात पण या गावांत एसटी येत नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कालपासून विद्यार्थ्यांची तर शाळेला गैरहजेरी लागली आहे. बहुतांश विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी एसटीचा मासिक पास काढून प्रवास करीत असतात परंतु एसटीच वेळेवर येत नसेल आणि विद्यार्थ्यांची शाळा जर बुडत असेल तर त्या पासच्या काय उपयोग असा प्रश्न सध्या पालकवर्गातून उपस्थित होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर एसटीची सेवा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी, विद्यार्थ्यांकडून आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
“सध्या एसटीच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. दौंड – सिद्धटेक शटल सेवा व्यवस्थित सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.”
– आर. डी. मगर, व्यवस्थापक दौंड आगार





