Pune District : आंबेगावच्या तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाच्या झळा

मंचर : आंबेगावच्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मार्च महिन्याच्या पंधरवड्यानंतर दुष्काळाच्या झळा जाणू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे प्रशासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी पावसाळ्यात शेवटी कमी प्रमाणात पाऊस झाला. पावसाळ्यातील शेवटच्या दिवसात परतीचा पाऊस न झाल्याने पूर्व भागातील गावांमधील विहिरींनी तळ काढला असून विविध पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. अशी माहिती वडगावपीर येथील शेतकरी योगेश आदक पाटील यांनी दिली.
गावातील जलस्रोत आटले असून शेतीपिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. तसेच पाणी नसल्याने शेतात जनावरांसाठी असणारा चारा कोरडा होत चालला आहे. त्यामुळे जनावरांना सांभाळण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात या भागात पाण्याची मोठी टंचाई असते.
मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची कमतरता भासू लागल्याने पुढील दोन, तीन महिने कसे जाणार याची काळजी शेतकऱ्यांना पडली आहे. या भागातील दृष्काळसदृश परिस्थितीचा आढावा प्रशासनाने तातडीने घ्यावा व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात.अशी मागणी वडगावपीर, धामणी, शिरदाळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.





