Pune District : विमानतळ प्रकल्पासाठी ड्रोन सर्व्हे होणार

दिवे : पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यापासून राज्य शासनाकडून एक एक पाऊल टाकले जात आहे. मागील आठवड्यात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लगेचच पुढील नियोजन करण्यास शासनाने हालचाली अतिशय वेगाने सुरु केल्या आहेत. आता ज्या गावांचा पूर्वी जमिनीवरून सर्व्हे झाला होता. त्या सातही गावांचा नव्याने ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती करण्यात येणार आहे. याबाबत एमआयडीसीकडून निविदा प्रसिद्ध केली आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमध्ये हा विमानतळ प्रकल्प होत आहे. या गावांचे एकत्रित २८३२ हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित केले जाणार आहे. दरम्यान, शासनाने जमिनीचे ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. दि. २६ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत निविदा भरून द्यायच्या आहेत. यासाठी शासनाने संकेतस्थळ जाहीर केले आहे. यावरून निविदा अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एकीकडे शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस विरोध वाढत असतानाच दुसऱ्या बाजूने शासनाने प्रकल्पाच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे याबाबत शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची विचारणा देखील केली नाही. त्यामुळे स्थानिक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. सात गावांचे एकूण क्षेत्रफळ अथवा एकूण क्षेत्र पाहिल्यास ५४७९. ११ हेक्टर इतके क्षेत्र असून विमानतळ प्रकल्पासाठी त्यातील २८३२ हेक्टर इतके क्षेत्र गेल्यास २६४७. ११ हेक्टर इतके क्षेत्र शिल्लक राहत आहे. यात वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांतील शासकीय अथवा गायरान जमीन जात नाही. मात्र उर्वरित गावांचे क्षेत्र समाविष्ट होत आहे. उर्वरित गावांचे शासकीय जमीन या आकडेवारीत समाविष्ट आहे.
शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
शासनाने यापूर्वी जमिनीवरून सर्व्हे करताना प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला होता. स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांना सर्व्हेच्या परिसरात फिरकूनही दिले जात नव्हते. आता होणारा सर्व्हे जमिनीवरून न करता थेट ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे. सद्यस्थितीत शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. कोणत्याही स्थितीत विमानतळ प्रकल्प होवू द्यायचा नाही, असा निर्धार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासन ड्रोन सर्व्हे पोलीस बंदोबस्तात करणार हे निश्चित आहे. मात्र या परिसरातील शेतकरी ड्रोन सर्व्हे होत असताना बघ्याची भूमिका घेणार की आरपारची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





