पुणे जिल्हा : निरगुडसर, मेंगडेवाडी परिसरात वाढल्या ड्रोनच्या घिरट्या

– परिसरात भीतीचे वातावरण
मंचरख – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात निरगुडसर, मेंगडेवाडी, वळसेमळा, थोरातमळा परिसरात ड्रोनच्या घिरट्या वाढल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निरगुडसर येथे मंगळवार, दि. २ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास थोरातमळा, वळसेमळा, बेटवस्ती, बेलसरवाडी येथे आकाशात ड्रोन फिरताना दिसले. तसेच मेंगडेवाडी येथेही ड्रोन फिरताना दिसले आहेत.
रात्री अचानक ड्रोन फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मळ्यात, वाडीवस्तीवर राहणारे नागरिक मध्यरात्रीपर्यंत ओट्यावर बसून होते. आकाशात ड्रोन फिरतानाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तरुणांनी ड्रोनचा पाठलाग केला होता. मेंगडेवाडी हद्दीत गन्या डोंगर येथे रात्रीच्या वेळी चाळीस ते पन्नास तरूण जमले होते. मात्र, ड्रोन कुठून आला ते समजले नाही.
याबाबत पारगाव पोलिसांना माहिती समजली असता पोलिसांनी मेंगडेवाडी, निरगुडसर या परिसरात पेट्रोलिंग करत ड्रोनचा माग घेतला. मात्र, सदर ड्रोन कुठून उडवले जात होते. याबाबत माहिती समजले नसल्याचे पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांनी सागितले.ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहनही सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन आकाशात उडतानाच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी काठापूर, पोंदेवाडी, लाखनगाव परिसरातही ड्रोन दिसले होते. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. मात्र, या ड्रोनपासून कुठलाही धोका नाही. नागरिकांनी घाबरू नये. तसेच हे ड्रोन कोण उडवत असेल, याबाबत काही माहिती मिळाली तर पारगाव पोलिसाशी संपर्क साधावा.
– नेताजी गंधारे, सहायक पोलीस निरीक्षक, पारगाव पोलीस ठाणे.





