Pune District : मदनवाडी येथे पुलावरून कंटेनर कोसळल्याने चालकाचा मृत्यू

भिगवण : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण गावाजवळील मदनवाडी (ता. इंदापूर) चौकातील पुलावरून मालवाहू कंटेनरखाली कोसळून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव (वय 37, रा. मुंबई; मूळ उत्तर प्रदेश) असे या चालकाचे नाव आहे. हा मालवाहू कंटेनर सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जात होता. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने सेवा रस्त्यावर वीस ते पंचवीस फूट उंचीवरून तो खाली कोसळला. या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. अत्यंत रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला.
सकाळी अपघात झाल्याने रहदारी कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. अपघाताचे वृत्त समजताच भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिस पाठवून बचावकार्य सुरू केले व कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले.
त्यात चालक गंभीर जखमी झाला होता त्यास येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.





