Pune District : पाणीटंचाईवर मात करीत ड्रॅगन बहरली

वाळुंज येथील नितीन इंगळे यांनी घेतले यशस्वी उत्पादन
एक एकरातून लाखोंचा नफा
राहुल शिंदे
नीरा – पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमधून पाणीटंचाई जाणवते. मात्र, याच पाणीटंचाईवर मात करीत वाळुंज येथील शेतकरी नितीन इंगळे यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगनची शेती फुलवली. मार्केटमध्ये सध्या ड्रॅगन फ्रुटला मोठी मागणी आहे. दरही चांगला मिळतो आहे. त्यामुळे त्यांना एक एकर ड्रॅगनच्या एक एकरांतून जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पादन मिळाल्याचे इंगळे यांनी सांगितले.
वाळुंज (ता. पुरंदर) येथे प्रगतशील शेतकरी नितीन इंगळे यांची शेती आहे. यापूर्वी मटकी, हुलगा असे पारंपारिक पीक घेतले जात होते. पाण्याची मोठी टंचाई असल्याने त्या ठिकाणी नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात नव्हते. पावसाळ्यात भरपूर पाऊस तर उन्हाळ्यात पूर्ण पाणीटंचाई असा हा परिसर होता. मात्र, चार वर्षांपूर्वी इंगळे यांनी त्यांच्या एक एकर शेतामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. चार वर्षांपूर्वी इंगळे यांनी त्यांच्या मित्राच्या बागेमध्ये फुडबाबतची आणि त्याच्या उत्पादनाची माहिती घेतली. तिथे त्यांनी काही फळे खाल्ली. त्याची चव घेतली. त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून आणि सोशल मीडियावरील माहितीवरून त्यांनी ही फळबाग लावण्याचा निर्णय घेतला.
इंगळे यांनी चार वर्षांपूर्वी ड्रॅगनच्या शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या 400 रोपांची लागण केली. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राकडून रोप आणले. त्यांना एक रोप 25 रुपये प्रमाणे मिळाले. त्यासाठी त्यांना दहा हजार रुपये खर्च आला. लागवड आणि सिमेंट खांब, रिंग, ड्रीप यासाठी त्यांना साधारण तीन लाख रुपये खर्च आला. वर्षभरातच त्याला फळधारणा सुरू झाली. सुरुवातीला कमी फळे निघाली. दुसऱ्या वर्षी त्यांना साधारण 2 टन उत्पन्न मिळाले. तिसऱ्या वर्षी त्यांना चांगले उत्पादन मिळाले. तिसऱ्या वर्षी त्यांना वर्षभरामध्ये 10 टन उत्पादन मिळाले. चौथ्या वर्षी त्यांना आतापर्यंत 12 टन उत्पादन मिळाले आहे. आणखी 8 टन उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी एकूण 20 टन उत्पन्न मिळणार आहे. बाजारात सध्या ड्रॅगन फ्रुटच्या फळाला सरासरी 65 ते 70 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारच्या विक्रीत रुपये दीडशे रुपये किलो याप्रमाणे विकले जात आहे. ड्रॅगन फ्रुटची मागणी जास्त असल्यामुळे व्यापारी शेतात येऊन खरेदी करतात. त्यामुळे मार्केट शोधावे लागत नाहीत.
ड्रॅगन फ्रुट लागवडीची पद्धत
ड्रॅगन फ्रुटची लागवड ही बेड पद्धतीने करण्यात आली. पावसाळ्यामध्ये त्या जमिनीमध्ये थोडसं पाणी येतं म्हणून ही बेड पद्धतीने लागवड केली. त्यामुळे पावसाळ्यात कितीही जास्तीचा पाऊस झाला तरी जमीन वापश्यावर राहते. त्यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड करताना त्याच्या फांद्यांचा उपयोग केला जातो. फांद्यांपासून रोप बनवले जाते किंवा फांद्या देखील आपण लागवड करू शकतो. साधारण दोन महिन्यात अशा फांद्यांना चांगल्या मुळ्या फुटतात. त्या झाडाची वाढ होण्यास सुरुवात होते.
लागवडीअगोदर सिमेंट एक सिमेंट खांब उभा केला जातो. त्याच्यावर सिमेंट रिंग टाकली जाते. त्या खांबाशेजारी रोपाची लागवड केली जाते. साधारण 10 बाय 8 फुटांवर लागवड केली जाते. एका एकरांमध्ये 400 झाडे लावली जातात. सिमेंट खांबाला आधार देत या झाडाला त्या रिंगवर आणले जाते. साधारणतः वेलवर्गीय पिकासारखीच याची काळजी घेतली जाते. लागवडीसाठी एकरी तीन लाखापर्यंत खर्च येतो, असे इंगळे म्हणतात.
सेंद्रिय पद्धतीचा वापर
लागवड आणि संवर्धनाची पद्धत अत्यंत सोपी आहे. या पिकावर किडीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र थोड्याफार प्रमाणात औषधही मारावे लागते. इंगळे यांनी रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय पद्धतीने या फळबागाची जोपासना केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील उत्पादित केलेल्या फळांची चव चांगली आहे.
कसे होते उत्पादन?
ड्रॅगनला मेच्या पहिल्या पंधरवड्यात फुलकळी लागायला सुरुवात होते. त्यानंतर वीस पंचवीस दिवसाच्या अंतरानंतर वेगवेगळ्या टप्प्यात फुलांचे बहार निघतात. साधारण दीड ते दोन महिन्याच्या अंतरावर त्याचे फळ तोडणी येते. वर्षभरात असे आठ ते नऊ वेळा या फळांची तोडणी होते. यामध्ये चार ते पाच वेळा चांगला बाहर मिळतो. उत्पादन चांगले येतं तर कधीकधी उत्पादन कमी देखील येते. मात्र, तरी वर्षभरात एक एकरामधून वीस टन फळांचे उत्पादन निघते. गेल्यावर्षी याच फळाला 185 रुपये भाव मिळाला. मात्र, यावर्षी होलसेल बाजारात 65 ते 70 रुपये किलो या दराने ड्रॅगन फ्रुटला बाजारात भाव मिळत आहे. व्यापारी जागेवरच येऊन खरेदी करत असल्याने वाहतूक व इतर खर्चही होत नाही.
दरात घसरण, तरीही फायद्यात
मागील वर्षीपेक्षा यावर्षी दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, तरी देखील उत्पादन चांगले मिळत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. चांगला नफा या पिकातून मिळतो आहे. लागवड झाल्यानंतर फार काय जास्त त्याला खर्च येत नाही किंवा मशागत करावी लागत नाही. मात्र, यावर लक्ष द्यावे लागते. दुर्लक्ष करून चालत नाही. काही किडींपासून याला जपावे लागतं. मात्र, त्या फार कमी असतात. पण उत्पादन चांगलं निघत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळायला हरकत नाही. असा सल्ला नितीन इंगळे यांनी शेतकऱ्यांना दिला.
प्रक्रिया उद्योगाला चालना
ड्रॅगन फ्रुटचे दर सध्या थोडे कमी जरी झाले असले तरी ते तोट्यात नाहीत. मात्र, शेतकऱ्यांनी आणखी लागवड केली तर त्याचा फायदा होईल. उत्पादन जास्तीचे झाले तर हे फ्रुट आपल्याला एक्सपोर्ट देखील करता येईल. त्यामुळे आपल्याला मोठी बाजारपेठ मिळेल. भावही चांगला मिळेल, फळावर प्रक्रिया उद्योग देखील सुरू करता येतील. ड्रॅगन फ्रुट हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. लोकांच्या आरोग्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी नक्कीच याची लागवड करावी, असे आवाहन इंगळे यांनी केले.





