Pune District : शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

शिरूर – शिरूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली असून मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. नव्याने तीन नगरसेवक पदांची वाढ करण्यात आली असून यंदा एकूण चोवीस नगरसेवकांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांकडून प्रारूप रचनेवरील हरकती व सूचना लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या आहेत.
मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले की, प्रारूप प्रभाग रचना नगरपरिषदेच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपले हरकती अथवा सूचना नगरपरिषदेच्या आवक-जावक विभागात सादर कराव्यात. त्यानंतर संबंधितांना स्वतंत्र सुनावणीसाठी वेळ देण्यात येईल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. मात्र, दि. ३१ ऑगस्टनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील निवडणुकीत २१ नगरसेवकांची निवड झाली होती. यावर्षी तीन जागांची वाढ करून चोवीस नगरसेवकांसाठी बारा प्रभागांची रचना करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर त्याच प्रभागांवर आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केली जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेच्या परिसरात संभाव्य उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या असून, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





