पुणे जिल्हा : १२ वर्षांच्या उदयोन्मुख मल्लाला ‘निरामय’चा खुराक

डॉ. विशाल खळदकर यांचा उपक्रम आदर्शवत
पारगाव – हल्ली डॉक्टर म्हणजे फक्त पैसा कमविणे, अशी उपमा तयार झाली आहे. याला फाटा देत माणसातील देवमाणूस केडगाव येथील निरामय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर केअर सेंटरचे डॉ. विशाल खळदकर यांनी दौंड तालुक्यात आदर्शवत वस्तूपाठ घालून दिला आहे. लहान वयात कुस्ती क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या व घरची हलाखीची परिस्थिती असलेल्या पैलवान ओंकार हनुमंत मिसाळ यांच्या पैलवानकीच्या खुराकाचा खर्च उचलला आहे.
ओंकार मिसाळ (वय १२, रा. वारजे माळवाडी पुणे) हा सातवीमध्ये शिकत आहे. ओंकार याच्या खुराकाचा व शालेय सर्व खर्च करण्याचा भार डॉ. विशाल खळदकर यांनी उचलला आहे. पैलवान ओंकार हनुमंत मिसाळ हा सद्या पारगाव येथील कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रीय पंच रवींद्र बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. पहिलवान ओंकार मिसाळ याने विविध स्पर्धेत बक्षिसे प्राप्त केली आहे. सांगलीचा प्रसिद्ध पैलवान निखिल माने यांच्यावर दोन वेळेस मात करीत विजय मिळविला आहे.
डॉ. विशाल खळदकर हे त्यांच्या निरामय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक महिन्याला एक गरीब रुग्णाचे मेडिकलपासून ते ऑपरेशन पर्यंतचा सर्व खर्च अगदी मोफत करीत आहेत. महिनाअखेर त्यांनी विविध आजारांच्या व लाखो रुपये खर्चाच्या ३७ गरीब रुग्णांवर मोफत उपचार, शश्रक्रिया करून त्यांना नवंसंजीविनी दिली आहे.
ओंकार मिसाळ हा कुस्ती खेळात अत्यंत तरबेज असून तो नक्कीच या क्षेत्रात चमकदार कामगिरी करेल. त्याचे ध्येय गाठण्यासाठी जरी त्याची परिस्थिती प्रतिकूल असेल तरी ओंकार महाराष्ट्र केसरीपर्यंत त्याचा सर्व खर्च करणार आहे.
– डॉ. विशाल खळदकर, निरामय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड कॅन्सर केअर सेंटर, केडगाव.





