Pune District: राजकीय पोळी भाजण्यासाठी आयुष्याची होळी करू नका

नारायणगाव : क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतिक असून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने याठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभारावे. तसेच कुणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी होऊ देऊ नका, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण कलुषित होत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंग्याच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ नये या भूमिकेशी सहमती दर्शवताना खासदार डॉ. कोल्हे यांनी जो कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल त्याची अवस्था हीच होईल, हे दाखवून देणारी औरंगजेबाची कबर आहे असे ठासून सांगितले.
सत्ता येते-जाते, राज्यकर्ते येतात-जातात, बदलतात पण एकदा का तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुमच्या आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते. तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचे शिक्षण केले, तुमच्या करिअरची स्वप्नं पाहिली. त्या करिअरच्या स्वप्नांना, आईवडिलांच्या स्वप्नांना कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नख लागू देऊ नका, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.





