पुणे जिल्हा : दौंडच्या ‘दादा’गिरीली घाबरू नका

रमेश थोरात : यवतमध्ये जंगी सभा
यवत/ राहू – दौंड तालुका संपूर्ण दहशत, दादागिरीखाली भयभीत झाला आहे. मात्र, तुम्ही कोणाच्याही दादागिरीला घाबरू नका, असा धीर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार रमेश थोरात यांनी दिला.
महाविकास आघाडीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी दौंड तालुक्यातील वाड्या- वस्त्या व गावभेट दौरा कोपरा बैठक घेतली आहे. रमेश थोरात यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यावेळी यवत येथील युवा कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवत येथील कार्यकर्त्यांनी बैलगाडीमधून स्वागत यात्रा काढली होती.
पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांनी गर्दी केल्याने पदयात्रेलाच सभेचे स्वरूप आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कुंडलिक खुटवड यांनी प्रस्तावना केली. दत्ता डाडर, लकडे, उत्तम गायकवाड, तात्यासाहेब ताम्हाणे, सोहेलभाई खान, आप्पासाहेब पवार, बाळासाहेब कापरे यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी महायुतीच्या कारभारावर सडकून टीका केली.
कुलांनी महादेव जानकरांना फसवले
रमेश थोरात म्हणाले की, मी जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. दौंडचा शेतकरी सधन झाला. त्याला शेतीला ठिबक पाइपलाइन, ट्रॅक्टर, आदी कामासाठी मुलांच्या शिक्षणासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले. यामध्ये कधीही मी विरोधक आणि माझा कार्यकर्ता असा भेदभाव केला नाही.
माझ्या धनगर समाज बांधवांना पहिल्यां कॅबिनेट बैठकीत आरक्षण देणार होते. ते दिले नाही. आमदार राहुल कुल यांनी महादेव जानकर यांचा पाठिंबा मिळवला होता. मात्र, त्यांना दगा दिला. त्यांचा एबी फॉर्म काढला. भाजपचा एबी फॉर्म त्याठिकाणी जोडून त्यांना फसवले. हे सगळं समाज बांधवांना माहिती आहे.





