पुणे जिल्हा : योग करा, निरोगी रहा

वाल्मिकी विद्यालयाने सामुहिक प्रात्यक्षिकाद्वारे दिला संदेश
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थ्यांनी सामुहिक प्रात्यक्षिक करत योग करा, निरोगी रहाचा संदेश दिला.
वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये प्राचार्य सतीश निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी, पाचवी ते बारावीपर्यंतच्या जवळपास 757 विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी एक तासभर सामुहिक योगासने केली. यावेळी, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ताडासन, वृक्षासन, चक्रासन, मकरासन, शशांकासन, प्राणायाम आदी योगप्रकार सादर केले.
याप्रसंगी,पर्यवेक्षक राजेशकुमार सोनवणे, राजेंद्र डोंगरे, अनिल दुर्गाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे, सुनिल ढवळे, राजेंद्र माने, आदित्य काळे, सतीश अधिकारी, लक्ष्मण भालसिंग, संजय निर्मळ, अनिल मखरे, निता कांबळे, प्रियंका कणेरे आदि शिक्षक उपस्थित होते. सहशिक्षक विशांत ठाकूर यांनी योगाचे महत्त्व विशद करून, प्रात्यक्षिक करून दाखविले.
तर विद्यालयातील अतुल गायकवाड, संदीप जाधव, दत्तात्रेय टिळेकर, गितांजली मोरे, अंकिता ठाकूर, शैला गवारी यांनी संयोजन केले.





