पुणे जिल्हा : अष्टविनायक रस्ता नारायणगावात घेणार मोकळा श्वास

उपबाजार समितीसमोर वाहन पार्किंग केल्यास कारवाई – शेलार
नारायणगाव – नारायणगाव कृषी उत्पन्न उपबाजार समिती समोरील अष्टविनायक रस्त्यावर बेकायदा वाहन पार्किंग केलेले आढळून आल्यास अशा वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले.
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून जाणाऱ्या अष्टविनायक रस्त्यावरील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत टोमॅटो, मेथी, धना आदी तरकारी शेतमालाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. भाजीपाला घेऊन येणारे पिकअप ट्रॅक्टर व ट्रक यासारखी चारचाकी वाहने अष्टविनायक रस्त्यावरील उपबाजार समितीच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग करून अष्टविनायक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करून वाहतुकीची कोंडी करीत असतात.
दनारायणगाव उपबाजार समिती समोरून मांजरवाडीच्या दिशेने जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, सचिव, आडतदार व व्यापारी यांची सहविचार सभा घेऊन अष्टविनायक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यास सांगितले.
कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी नारायणगाव उपबाजार समितीच्या परिसरात अनोळखी अथवा संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलीस स्टेशनला माहिती देणे बंधनकारक असून आडते, व्यापारी, व परिसरातील व्यवसायिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला आहे.





