पुणे जिल्हा : जेऊर येथे गणित, विज्ञानाच्या प्रात्यक्षिका पुस्तिकेचे वाटप

वाल्हे – जेऊर (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर या विद्यालयातील माजी मुख्याध्यापक दिलीप साबळे व सेवानिवृत्त शिक्षक मनोहर धुमाळ या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपणे, गरजेचे आहे व प्रत्येक जण समाजाला काहीतरी देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक पुस्तिका व इंग्रजी वर्कबुक यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तमराव धुमाळ होते. यावेळी, पुस्तकांचे वाटप श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंतराव तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक दिलीप साबळे हे जेऊर गावचे सुपुत्र असल्याने जुन्या शालेय जीवनातील कठीण प्रसंग विद्यार्थ्यांसमोर त्यांनी मांडले.
कष्टाशिवाय यश मिळत नाही याची जाणीव ही त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश साळुंखे यांनी तर चंद्रकांत सांगळे यांनी आभार मानले.





