Pune District : श्री क्षेत्र भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था

– बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंचच्या वतीने उद्या रास्ता रोको
मंचर – बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाणाऱ्या मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाट, तळेघर ते भीमाशंकर दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज अनेक लहान – मोठे अपघात होत आहे. हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय धोकादायक झाला असल्याने या रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंच गुरुवार दि. १७ रोजी तळेघर-भीमाशंकर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे वर्षभर देशभरातून लाखो भाविक, पर्यटक व निसर्गप्रेमी येथे येतात.सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू झाला असल्याने पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारांहून अधिक भाविकांसह इतर राज्यातील भाविक दर्शन व पर्यटनासाठी येथे येत आहे. भीमाशंकरला पोहोचण्यासाठी मंचर-घोडेगाव-डिंभे-तळेघर-भीमाशंकर तसेच राजगुरूनगर-वादा-शिरगाव-मंदोशी-तळेघर-भीमाशंकर हा मार्ग वापरला जातो. यावर्षी मे महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने भीमाशंकर परिसरातील धबधबे आणि निसर्गरमणीय ठिकाणावर निसर्गप्रेमी, पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकरला व पर्यटनस्थळांकडे जाताना अनेक लहान मोठे खड्डे चुकवत जावे लागत आहे. या कसरतीच्या प्रवासात खड्डे चुकवीत असताना दुचाकीस्वार अनेक वेळा घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्या दुचाकीवर महिला, लहान मुले असल्यास त्यांना त्याचे परिणाम दुखापतीपर्यंत भोगावा लागत आहे. तर चारचाकी वाहन खड्डयांवरून उड्या मारत प्रवास करत आहे. यामध्ये त्यांच्या गाडीचा टायर फुटणे, पंक्चर होणे आदी घटना घडत असून गाडीत प्रवाशांची हाडे खिळखिळी होण्याचा त्रास
या प्रवासात होत आहे.यासाठी रस्ता दुरूस्तीची कामे तसेच यादरम्यान असलेल्या वेड्या वाकड्या वळणांवरील झाडे झुडपे, रिफ्लेक्टर, दिशा दर्शक फलक, साईट पट्टी आदी कामे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित करून चांगल्या पध्दतीने करून घ्यावीत, या मागणीसाठी बिरसा ब्रिगेड आदिवासी मंचने वारंवार संबंधित अधिकारी यांना निवेदने दिली.परंतु अद्याप रस्ता दुरुस्ती झाली नसल्याने गुरुवार दि.१७ रोजी पालखेवाडी-राजपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
………..





