पुणे जिल्हा : आळंदीत कार्तिकवारीत चर्चा राजकारणाच्या

आळंदी – राज्यभरातून वारकरी आपली वारी रुजु करण्यासाठी आळंदीत दाखल झाले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालाची उत्सुकता वारकर्यांनाही होती. दिवसभर निवडूण कोण येणार?, कोणता पक्ष आघाडीवर, ? आता मुख्यमंत्री कोण होणार? याचीच चर्चा धर्मशाळा, तंबू आणि दर्शनबारीत रंगली होती.
हरिनामाबरोबर बहुतांश वारकरी निकालाच्या चर्चेत दंग होते. महायुतीच्या आघाडीमुळे आता धर्माचे सरकार आले या समाधानाची लकेर वारकर्यांच्या चेहर्यावर होती. वारकरी लाडक्या बहिणीही हसून दाद देत होत्या. हे चित्र आहे आळंदीत विविध ठिकाणचे.
शनिवारी सकाळपासून निकालाकडे अनेकजण लक्ष देवून होते. मोबाईलवर, कुणी मुक्कामाच्या ठिकाणी, हॉटेलमधे टीव्हीवर निवडणूकीच्या निकालावर लक्ष देवून होते. सकाळच्या अकरापर्यंतच्या टप्प्यात आपापल्या भागात जोर कुणाचा, कोण नक्की निवडून येणार यावर वारकर्यांचा जोर होता. अनेकजण गावाकडे मोबाईलवर माहिती घेत होते.
कुणाचे लीड किती, कोणत्या गावात लीड कमी जास्त झाले याची खबरबात घेतली जात होती. दुपारी बारानंतर राज्यातील सत्तेचे गणित सुटले होते. महायुती सरकार आघाडीवर होते. वारकरी संप्रदायातून आनंद व्यक्त केला जात होता.
यापैकी मुख्यमंत्री कोण असावा याबाबत एकनाथ शिंदेबाबत अनेकांनी भावना व्यक्त केली. तर काही वारकर्यांनी भाजपाला बहूमत असल्याने भाजपाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगीतले. एकंदर हरिनामत दंग वारकर्यांना निवडणुकीच्या निकालाची तसेच सरकार कोणाचे याचीही भुरळ असल्याचे पाहायला मिळाले.
निवडक वारकर्यांच्या प्रतिक्रिया
बीडच्या गजराबाई मुंडे म्हणाल्या, लाडकी बहिण योजनेमुळे गावाकडच्या गरिब महिलांना हातात खर्चपाण्याचा पैका आला. यामुळे आम्ही महिला मुंडे साहेब सांगीतले त्यालाच मत दिले.
नांदेडच्या लोहा तालुक्यातील बबनराव टोळ यांनी सांगीतले, युतीचे पुढारी धर्मासाठी लढत होते. हिंदु धर्म आणि विचार टिकवला पाहिजे. कॉग्रेस याचा विचार करत नाही. म्हणून आम्ही युतीलाच पाठिंबा दिला.
नगर जिल्ह्यातील दिनकर मोटे म्हणाले, आमच्याकडे जात धर्म आणि पैसा यावर निवडणुक असतेच. पण शेतकर्यांचा विचार कोण करतो हे पाहून मतदान केले.
जालन्याचे शंकर हाके यांनी सांगितले, वारकर्यांना, गोरगरिबांना युतीचे लोक मदत करतात. धर्माचे सरकार असल्याने आम्ही त्यांचे मागे आहोत.
नाशिकमधिल अंकुशराव देवरे म्हणाले, आमच्याकडे शेतमालाला भाव याबाबत निवडणूक लढण्याऐवजी आरोपबाजी, घराणेशाही, जातीपातीवरच लढली. निवडूण कोणाला द्यायचे हा प्रश्न होता. केंद्रात जे सरकार तेच राज्यात असेल तर पैका मिळेल हेच गणित समोर होते.
मोहोळमधिल बजाबा निंबाळकर म्हणाले, आम्ही दिंडीसोबत चार पाच दिवस पायी चाललो. गावाकडे लक्ष होते. पण कुणीही निवडून आला तरी महागाई कमी करत नाही. पण वारकर्यांचे सरकार आले आहे. आता धर्माचे राज्य चालणार.
अध्यात्मिक आघाडी वारकरी संप्रदायाशी निगडीत
भाजप आणि शिवसेनेची अध्यात्मिक आघाडी वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. याचबरोबर वारीत दोन्ही पक्षांनी हिरिरीने निधि वाटप करत वारकर्यांना विविध सोयी पुरवल्या. याचबरोबर हरिनाम सप्ताह, कथेच्या माध्यमातून पद्धतशीर प्रचार केला. विविध साधूंचे घेतलेले मेळावे या निवडणूकीत कामी आले. उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस याबाबत आघाडीवर होते. तुलनेत महाविकास आघाडीचे वारकरी संप्रदायाची मोट बांधण्यात अपयशी ठरले. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात ठळकपणे जाणवत होता.





