लोणी देवकर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु ते लोंढे वस्ती दरम्यान महामार्गालगत वन परिक्षेत्रात कचर्याचे ढीग च्या ढीग साचले असून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच इंदापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र आहे. या क्षेत्रात दुर्मिळ चिंकारा जातीच्या हरणांचा तसेच विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वावर असतो. महामार्गावर अवैध रित्या कचरा, कोंबड्यांचे अवशेष, वापरात नसलेली औषधे आदींसह हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ ढीगच्या ढीग पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे पाटी ते लोंढे वस्ती दरम्यान आहेत. त्यामुळे महामार्गावर दुर्गंधी तर पासरलीच आहे तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने एखाद्या वाहनाला अपघात तसेच वन्य जीवांना धोका संभवत आहे.त्यामुळे संबंधित वन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आदींनी या ठिकाणी कचरा टाकणार्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाश्यांमधून होत आहे. कचर्यामुळे प्रदूषणास पर्यावरणाचा र्हास होत असल्याने तसेच वैद्यकीय कचरा आणि नष्ट न होणारा कचरा यामुळे जैवविविधता धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आम्ही संबंधित ठिकाणी वन विभाग,राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने गस्ती पथक स्थापन केली असून सदर ठिकाणी कचरा टाकणारे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहोत. – अजित सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी